आमदार सतेज पाटील यांची अतिक्रमणधारकांना ग्वाही; अतिक्रमण निर्मुलनाविरोधात आवाज उठवल्याबद्दल आमदार पाटील यांचा सत्कार
कोल्हापूर प्रतिनिधी
गायरानातील अतिक्रमणे काढण्याच्या निर्णयाविरोधात लवकरच जिह्यातील अतिक्रमणधारकांचा महामोर्चा काढणार असल्याची ग्वाही आमदार सतेज पाटील यांनी दिली. कसबा बावडा येथे एका कार्यक्रमाप्रसंगी निगवे दुमाला येथील ग्रामस्थांशी ते बोलत होते.
सतेज पाटील म्हणाले, गायरानातील अतिक्रमणे 31 डिसेंबर 2022 पर्यंत काढण्याचे आदेश उच्च न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. त्यानुसार जिल्हा जिह्यामध्ये अतिक्रमणे काढण्यासंदर्भात प्रशासनाच्या हालचाली सुरू आहेत. यामुळे गेली कित्येक वर्ष आपल्या कुटुंबासह गायरानात निवारा करून राहत असलेल्या ग्रामस्थांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. राज्यातील लाखो ग्रामस्थांच्या निवाऱयाचा प्रश्न आहे. या कार्यवाहीमुळे लाखो कुटुंबे बेघर होणार आहेत. त्यामुळे राज्य शासनाने या सर्व गोष्टींचा विचार करून या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत या आदेशाला स्थगिती मिळवावी, अशी मागणीही त्यांनी केली.
ग्रामस्थांच्या महत्त्वाच्या प्रश्नात आवाज उठवला. त्याबद्दल निगवे दु ता. करवीर येथील ग्रामस्थांनी आमदार सतेज पाटील यांचे अभिनंदन केले. या कार्यवाहीविरोधात आपण जो निर्णय घ्याल, त्या प्रत्येक निर्णयात आम्ही बरोबर आहोत, असे आश्वासन दिले. या वेळी सरपंच ज्योत्स्ना कीडगांवकर, माजी सरपंच सुरेश पाटील, दिलीप यादव, प्रकाश पाटील यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.









