कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत येण्यासाठी आमच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतींचे ठराव आम्ही देण्यास तयार आहोत.आमदार सतेज पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वाखाली ग्रामपंचायतींचे ठराव द्यावेत, त्यांना ओपन चॅलेंज आहे असे जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शौमिका महाडिक पत्रकार परिषदेत म्हणाल्या.
कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीसंदर्भात गेल्या दोन दिवसापासून चर्चा सुरु झाली आहे.हद्दवाढ आणि खंडपीठ या प्रश्नांच्या अनुषंगाने कोल्हापूर बंद आणि मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचा इशारा दिला आहे.या पार्श्वभूमीवर शौमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदेत हद्दवाढीसंदर्भात आपली भूमिका स्पष्ट केली. त्या म्हणाल्या, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत येण्यासाठी काही गांवे तयार आहेत.पण मुळात शहरातच सुविध नाहीत. महापालिकेचे प्रकल्प अनेक वर्षे रेंगाळले असून शहराचा विकास झालेला नाही. गेली अनेक वर्षे महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती.तरीही विकास का झाला नाही अशी विचारण केली. याऊलट ग्रामपंचायती सक्षम होऊन त्याठिकाणी विकास होत आहे. शहरातील लोक ग्रामीण भागात जात आहेत.याचा विचार झाला पाहिजे.ज्यावेळी कोल्हापूर शहराचा विकास होऊन त्यावेळी ग्रामपंचायती आपण होऊन हद्दवाढीत येतील असे सांगत आपण हद्दवाढीच्या विरोधात नसल्याचे स्पष्ट केले. कोल्हापूर बंद ठेवून किंवा काळे झेंडे दाखवून हा प्रश्न सुटणार नाही तर यासाठी कोणीतरी पुढाकार घेऊन चर्चेतून मार्ग काढला पाहिजे.आपण पुढाकार घेण्यास सुध्दा तयार असल्याचे महाडिक म्हणाल्या.
आमदार सतेज पाटील यांच्यावर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीत येण्यासाठी सतेज पाटील यांनी त्यांच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचयतींचे ठराव द्यावेत, आम्ही आमच्या नेतृत्वाखालील ग्रामपंचायतीचे ठराव देवू. हे त्यांना ओपन चॅलेंज आहे. पत्रकार परिषदेला राजाराम कारखान्याचे संचालक तानाजी पाटील, शिरोली सरपंच पद्मजा करपे, गांधीनगर सरपंच संदीप पाटोळे, माजी जिल्हा परिषद सदस्य राजू संकपाळ, सरनोबतवाडी उपसरपंच प्रमोद कांबळे, उंचगाव माजी सरपंच अनिल शिंदे, अण्णा मोरे, प्रमोद हुदले, महेश पाटील, पृथ्वीराज जाधव, संग्राम पाटील भाजपच्चे दक्षिण ग्रामीण मंडळ अध्यक्ष अनिल पंढरे उपस्थित होते.