प्रतिनिधी,कोल्हापूर
Satej Patil News : राज्यासह देशातील राजकारण दुषित झाले आहे. घाणेरड्या राजकारणामुळे काही पक्षांचे विभाजन झाले असले तरी काँग्रेसचा एकही आमदार भाजप-शिवसेनेसोबत जाणार नाही. जनतेचा केवळ काँग्रेसवर विश्वास उरला आहे. भारत जोडो यात्रेमधून राहुल गांधी यांनी सामान्यांच्या प्रश्नांवर आवाज उठवण्याचे काम केले. त्यामुळे माझ्यासह काँग्रेसचा कोणीही नेता काँग्रेसमधून बाहेर पडणार नाही. राज्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी म्हणूनच लढणार असून कोल्हापूर जिल्ह्यातही काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढणार आहे. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीसोबत येण्याचे आवाहन केले असले तरी ते शक्य नाही, अशी स्पष्टोक्ती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केली.
आमदार सतेज पाटील यांनी जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी अधिवेशनात काही प्रश्नांची उत्तरे द्यायची नाहीत असं सरकारने ठरवल्याचा आरोप केला.शेतकरी अनुदान,शिक्षक भरती,रायगडमधील घटना यावर सरकार बोलत नाही.विरोधी बाकावरील आमदारांना सरकार निधी देत नाही.हे मंत्री राज्याचे नेतृत्व करतात की मतदारसंघाचे हा प्रश्न पडतो.सत्ताधारी आमदारांना 100 टक्के झुकते माप देणे हे चूक आहे.महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वजण एकत्र आहोत.अधिवेशनामध्ये किंवा भविष्य काळात आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच एकत्र राहू.
मुख्यमंत्रीपदाचा निर्णय दिल्लीत
राज्यातील दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना मुख्यमंत्रीपदाचे वेध लागले असले तरी त्याचा निर्णय दिल्लीत होतो,हे सर्वांच्या लक्षात आले आहे.कर्नाटकमध्ये तीन महिने झाले तरी भाजपला विरोधी पक्षनेता देता आला नाही.मात्र महाराष्ट्रात आम्ही तसे करणार नाही.लवकरच काँग्रेसचा विरोधी पक्षनेता दिला जाईल. राज्यातील मंत्रीमंडळ विस्तारासाठी काही विद्यमान मंत्र्यांना राजीनामे द्यावे लागणार आहेत.त्यामुळे मंत्रीपदाचे वेध लागलेल्या आमच्या मित्रांनी वर्षापूर्वी शिवलेले जॅकेट आता बसणार का?हे आम्ही त्यांना नेहमी विचारत असतो.मंत्रिमंडळ विस्ताराचा तिढा सुटत नसल्यामुळे विस्ताराची शक्यता कमी असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
मंत्री मुश्रीफ यांची ऑफर स्वीकारणार नाही
मंत्री हसन मुश्रीफ यांनी महायुतीसोबत येण्याची खुली ऑफर दिली होती.पण काँग्रेस पक्षाव्यतिरक्ति अन्य कोणताही विचार करू शकत नसल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले.
मनपा आयुक्त कोणाचा? या वादात कोल्हापूरचे नुकसान
कोल्हापूर महापालिकेला गेले दोन महिने आयुक्त नाही.भाजपने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचे की शिवसेनेने दिलेल्या अधिकाऱ्याचे हा वाद आहे. या वादात शहराचे प्रचंड नुकसान होत आहे.शहरातील 29प्रभागांना महापुराचा फटका बसतो.अशा परिस्थितीत सध्या पावसाचे प्रमाण वाढले असून कधीही महापूरसदृष्य स्थिती निर्माण होऊ शकते.त्यामुळे महानगरपालिकेला तत्काळ आयुक्त देण्याची मागणी विधानपरिषदेत केली आहे.
कोल्हापूर लोकसभेच्या जागेसाठी आग्रही
कोल्हापूर जिह्यातील लोकसभेच्या दोन जागांपैकी एक जागा काँग्रेसला मिळावी ही आमची मागणी आहे.त्याबाबत पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना सांगितले आहे.सध्या जिह्यात काँग्रेस प्रबळ आहे.पण महाविकास आघाडी म्हणून जागा वाटप करताना नेमका काय निर्णय होतो,हे पहावे लागेल असे आमदार पाटील यांनी सांगितले.
मणिपूरची घटना झाकून ठेवण्याचा प्रयत्न
एका बाजूला देशाचा अमृत महोत्सव साजरा केला जात आहे.दुसऱ्या बाजूला मणिपूरसारख्या घटना घडत आहेत.दीड महिन्यांपूर्वी ही घटना घडली असली तरी किमान संसदेत याविषयी चर्चा होणे अपेक्षित आहे.पुढील काळामध्ये अशा घटना होऊ नये यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.आपले पाप समोर येऊ नये यासाठी अशा घटना समोर येऊ दिल्या जात नसल्याचा आरोप आमदार पाटील यांनी केला.
वातावरण दूषित करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष हवे
सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टवरून कोल्हापुरात दंगल घडली.ही घटना ताजी असतानाच अद्यापही काही समाजकंटकांकडून आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्या जात आहेत.त्यामागे त्यांचा नेमका हेतू काय,ते कोण आहेत? याच्या मुळापर्यंत पोहोचण्याची पोलिसांची जबाबदारी असल्याचे आमदार पाटील यांनी नमूद केले.








