कसबा बावडा प्रतिनिधी
सभासद हे कारखान्याचा आत्मा असतात तर कारखाना प्रशासन सुरळीत चालण्यासाठी कर्मचा-यांची भूमिका महत्वाची असते. गेल्या 28 वर्षाच्या कारभारात सभासद आणि कर्मचारी या दोन्ही घटकांकडे सत्ताधा-यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे परिवर्तन आघाडीची सत्ता आल्यानंतर सभासद आणि कर्मचा-यांना सन्मानाची वागणूक निश्चित देऊ. तसेच सभासदांच्या मुलांना नोकरीत प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आमदार सतेज पाटील यांनी केले. वाशी येथे आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.
हेही वाचा >>> नरके गट पैरा फेडणार! सतेज पाटील यांना नरके गट गटाचा पाठींबा
आ.सतेज पाटील पुढे म्हणाले, कारखान्यामध्ये सर्वसमावेश विचारांचा कारभार करून निर्णय प्रक्रियेमध्ये सभासद आणि कर्मच्रायांना सहभागी करुन घेतले जाईल. कारखान्यातील कर्मच्रायांचे पगार प्रत्येक महिन्याला वेळेवर देण्याचे नियोजन आम्ही करु. अनेक वर्षे नोकरी केलेल्या पात्र कर्मच्रायांना नोकरीत कायम करण्याचा आमचा प्रयत्न राहिल. सभासद तसेच कर्मचारी यांचा अपघात मृत्यू विमा 2 लाख करण्यात येईल. कारखाना कर्मच्रायांसाठी मेडीक्लेम सुविधा देण्याबरोबरच कर्मचारी कामावर असताना दुर्दैवी मृत्यू झालेस त्यांचे वारसांना नोकरीवर घेण्यात येईल. सभासद आणि कर्मचारी हे दोन्ही घटक समाधानी ठेवून त्यांचा कारखान्याच्या प्रगतीसाठी योगदान वाढविण्यावर आमचा भर राहील असेही त्यांनी सांगीतले.
जिल्हा बँकेच्या माजी संचालिका उदयानी साळुंखे म्हणाल्या, वाशी गावचे मंदिर बांधकामावेळी देवस्थान समितीचे पदाधिकारी देणगी मागायला गेलो, तेव्हा वाशीकरांना मागायची सवयच आहे असे महाडिक म्हणाले होते. मग आता तुम्ही आमच्याकडे मते का मागता? सर्वसामान्यांचं हित न पाहता स्वत?चे खिसे भरणारी ही प्रवृत्ती बाजूला करण्यासाठी वाशी गाव राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीला सर्वाधिक मताधिक्य देईल.
गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील म्हणाले, निवडणूक राजारामची असून गोकुळबाबत महाडिक गैरसमज निर्माण करण्याचे काम करत आहेत.
रघुनाथ चव्हाण म्हणाले, आम्ही वाशीत एकाच गावात तीन उमेदवार दिले म्हणता, मग तुम्ही शिरोलीत तीन उमेदवार का दिले? त्यातही दोन महाडिकांच्या घरातले उमेदवार दिले, मग तुम्हाला दुस-यावर बोलण्याचा अधिकार काय? कार्यक्षेत्रातील शेतक-यांना डावलून येलूरचे सभासद वाढविणा-या महाडिकांना या निवडणुकीत सभासद हिसका दाखवतील.
यावेळी संदीप बळीराम पाटील, कृष्णात पुजारी, बबन रानगे, संभाजी शंकर पाटील, बी. के. चव्हाण, महादेव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी गोकुळ संचालक बयाजी शेळके, अंजनाताई रेडकर, भारती पोवार, शारंगधर देशमुख, महेश चव्हाण, एल. एस. पाटील, मोहन धुंदरे यांच्यासह शेतकरी सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.