ऑनलाईन टीम / तरुण भारत :
मी कोणत्या पवारांसोबत जायचं याचा निर्णय झाला आहे. जनतेचा कौल अजित पवार यांच्या बाजूने आहे. मी जनतेची सेवक म्हणून अजित पवारांना पाठिंबा देत असल्याचे देवळालीच्या आमदार सरोज अहिरे यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार आज नाशिक दौऱ्यावर आहेत. त्यांच्या स्वागतासाठी देवळालीच्या आमदार सरोज अहिरे सकाळी रेल्वे स्थानकावर हजर होत्या. त्यावेळी माध्यमांशी आहिरे यांना तुम्ही कोणत्या पवारांसोबत आहात, यासंदर्भात प्रश्न केला. त्यावेळी आहिरे म्हणाल्या, प्रमुख लोकांशी चर्चा करुन मी यासंदर्भात निर्णय घेईन असे म्हटले होते. माझी त्यांच्याशी चर्चा झालेली आहे. जवळपास 95-98 टक्के लोकांचं असं म्हणणं आहे की, विकासासाठी अजित पवारांसोबत जायला हवं. अजित पवारांनी माझा उल्लेख विकास कन्या म्हणून केला होता. तेच टिकवून ठेवण्यासाठी मी त्यांना पाठिंबा देत आहे. जनतेचा कौल अजित पवारांच्या बाजूने आहे. मी जनतेची सेवक म्हणून अजित पवारांसोबत काम करेन.
सुप्रिया सुळेंच्या भेटीबद्दल विचारले असता त्या म्हणाल्या, राष्ट्रवादी कुटुंबातील सदस्य म्हणून सुप्रिया सुळेंनी माझी भेट घेतली होती. माझ्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी त्या आल्या होत्या. आमच्यात कोणतीही राजकीय चर्चा झाली नव्हती.








