पाचगाव वार्ताहर
‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’ ला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून दोन दिवसात ९ हजार १३२ जणांनी प्रत्यक्ष मुलाखती दिल्या. जॉब फेअरच्या उत्कृष्ट नियोजनाबद्दल व नोकरी इच्छूकांनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल सहभागी कंपनीच्या प्रतिनिधीनी समाधान व्यक्त केले.
आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार ऋतुराज पाटील यांच्या संकल्पनेतून ‘ज्ञान आशा फौडेशन’, ‘द डेटा टेक लॅब’ व ‘नॅस्कॉम’ यांच्या सहकार्याने साळोखेनगर येथील डी. वाय. पाटील कॅम्पस् येथे ५ व ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या ‘कोल्हापूर दक्षिण जॉब फेअर’चे आयोजन करण्यात आले होते. तेलंगणा, गुजरात, पुणे, मुंबई, नाशिक आणि कोल्हापूरमधील अनेक नामांकित आंतरराष्ट्रीय कंपन्यासह एकूण २४८ कंपन्या या जॉब फेअरमध्ये सहभागी झाल्या होत्या. दोन्ही दिवस साळोखेनगर परिसरात नोकरी इच्छूकांच्या गर्दीचा महापूर उसळला होता.
यावेळी आमदार ऋतुराज पाटील म्हणाले, जॉब फेअरच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणावर युवकांना रोजगार देऊ शकलो याचे समाधान आहे. राज्यातील व राज्याबाहेरील विविध कंपनीमध्ये मुलाखतीची संधी यामाध्यमातून कोल्हापूरमधील युवा पिढीला आम्ही मिळवून देऊ शकलो. यामध्ये सहभागी सर्व कंपनीचे मी आभार मानतो. यापुढेही मिशन रोजगार च्या माध्यमातून नोकरी विषयक अपडेट फेसबुक पेजद्वारे पोचवले जातील. जास्तीत जास्त युवकांना रोजगार मिळावा यासाठी यापुढेही आमचे प्रयत्न सुरूच राहतील.
आमदार ऋतुराज पाटील यांचे मायक्रो प्लॅनिंग
हे जॉब फेअर यशस्वी होण्यासाठी गेल्या दोन महिन्यापासून आमदार ऋतुराज पाटील यांनी नियोजनबध्दरित्या प्रयत्न केले. त्यांनी विविध उद्योग संघटनांच्या प्रतिनिधीशी बैठका, पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील इतर जिल्हे व अगदी राज्याबाहेरील कंपनीच्या प्रतिनिधींशी संपर्क करून त्यांना कोल्हापुरात निमंत्रित केले. गेल्या दोन दिवसांपासून 500 हून अधिक स्वयंसेवकांच्य टीम जॉब फेअरच्या नियोजनासाठी अविश्रांत परिश्रम घेतले.