तासगाव / सुनिल गायकवाड :
फुल उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन कृत्रिम (प्लास्टिक) फुलावर बंदी आणावी, यासाठी आ. रोहित पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांच्या या पवित्र्याचे फुल उत्पादक शेतकऱ्यांतून स्वागत होत असून समाधान व्यक्त केले जात आहे. तर आ. रोहित पाटील यांनी प्लास्टिक फुलांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान तर होत आहेच. शिवाय आरोग्यासाठी घातक असून याचा दुष्परिणाम होत आहे. याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे, असे मत व्यक्त करून प्लास्टिक फुलांची होळी केली आहे.
सांगली जिल्हा हा पूर्वीपासून फुलशेतीमध्ये राज्यात दिशादर्शक राहिला आहे. जिल्ह्यात गुलाब, शेवंती, झेंडू, निशिगंध, मोगरा, चाफा, यासारखी पारंपारिक फुले तसेच जरबेरा, जिप्सोफिला, कार्निशन, डच गुलाब, अर्किड, यासारखी हरितगृहामधील विदेशी फुले पिकवणारे हजारो शेतकरी आहेत. सन २००० ते २०१५ पर्यंत जिल्ह्यात ३०० ते ४०० हरितगृह शेतकरी होते. मात्र भारतीय बाजारपेठेत कृत्रिम फुलांच्या शिरकावामुळे या व्यवसायाला मोठा फटका बसला आहे. तर सध्या जिल्ह्यात केवळ ३५ ते ५० हरितगृह शेतकरी शिल्लक राहिले आहेत.
गेल्या १० वर्षात कृत्रिम फुलांच्या विळख्यामुळे पारंपारिक फुलशेतीवरही विपरीत परिणाम झाला आहे. सणासुदीलाही झेंडू शेवंती, मोगरा, यांच्या कृत्रिम माळा सर्वत्र उपलब्ध असल्याने नैसर्गिक फुलांना बाजारपेठ मिळत नाही. यामुळे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती पूर्णपणे ढासळली आहे. फुलशेतीचे क्षेत्रही झपाट्याने कमी होत चालले आहे.
फुलशेती केवळ शेतकऱ्यांनाच नव्हे तर मजूर, वाहतूकदार, फुल व्यवसायिक, फुले आडते, फुल सजावट कारागीर, यासारख्या अनेकांना रोजगार निर्माण करते. फुलशेती बंद झाल्यास या सर्वांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होईल. याशिवाय फुलांवर बसणाऱ्या मधमाशांमुळे इतर शेती पिकांचे परागीभवन होऊन उत्पादन वाढते. फुलशेती पूर्णपणे बंद झाल्यास मधमाशांचा गंभीर प्रश्न निर्माण होऊन पर्यावरणाचे संतुलन बिघडण्याची भीतीही शेतकऱ्यांनी आ. रोहित पाटील यांच्या समोर व्यक्त केली होती. हे सर्व तसेच फुल उत्पादक शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेऊन आ. रोहित पाटील यांनी आक्रमक पवित्रा घेत एक पाऊल पुढे टाकले आहे. त्यांनी राज्यात प्लास्टिक फुलावर बंदी आणावी, अशी मागणी विधिमंडळातील सत्ताधारी व विरोधी पक्षातील तब्बल १०५ आमदारांच्या स्वाक्षरीच्या पत्रासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तर मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीमध्ये यासाठी बैठक बोलावून तातडीने निर्णय घ्यावा, असे ही आ.पाटील यांनी यामध्ये स्पष्ट केले आहे.
तसेच फलोत्पादन मंत्री भरत गोगावले व पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचीही त्यांनी भेट घेऊन याबाबतचे निवेदन दिले आहे.
- प्लास्टिक फुलांची होळी : शासनाने दखल घ्यावी
दादर येथील स्व. मीनाताई ठाकरे फुल मार्केट येथे आ. रोहित पाटील यांनी भेट दिली. तिथे असलेल्या व्यापारी व शेतकरी वर्गाची भेट घेतली. कृत्रिम फुले याबाबत घटकाचे मत व बैठकीत मांडायचे मुद्दे याबाबत चर्चा केली. येथेच आ. रोहित पाटील यांच्या हस्ते प्लास्टिक फुलांची होळी करण्यात आली. यावेळी बोलताना आ. रोहित पाटील म्हणाले, प्लास्टिक फुलांमुळे फुल उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच फुल विक्रेत्यांचे मोठे नुकसान होत आहे. प्लास्टिक फुले कंझ्युमरच्या आरोग्यासाठी घातक आहेत. याचा दुष्परिणाम होत आहे. अशा सर्व गोष्टींचा विचार गृहित धरावा लागणार आहे. अशा कंपन्या सध्या निदर्शनास आलेल्या नाहीत. पण सिंथेटिक कलर असतील किंवा प्लास्टिक मटेरिअल असेल याचा दुष्परिणाम हा सगळ्याच गोष्टीवर फार मोठ्या प्रमाणात होत आहे. याची दखल शासनाने घेणे गरजेचे आहे, असेही आ.रोहित पाटील यांनी स्पष्ट केले.








