चार नगरसेवकांनी घेतली जारकीहोळी यांची भेट : मनपात चर्चेला ऊत
बेळगाव : बेळगाव महापालिकेची महापौर व उपमहापौर निवडणूक दि. 15 मार्च रोजी जाहीर झाल्याने इच्छुकांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. त्यातच महापालिकेच्या राजकारणात माजी मंत्री व गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांचीदेखील आता एंट्री झाली आहे. सत्ताधारी गटातील 3 आणि एक अपक्ष अशा चार नगरसेवकांनी नुकतीच आमदार रमेश जारकीहोळी यांची गुप्त भेट घेतल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे महापालिकेच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
महापौर सविता कांबळे आणि उपमहापौर आनंद चव्हाण यांचा कार्यकाळ पूर्ण होऊन महिना उलटला तरी निवडणूक जाहीर झाली नव्हती. त्यातच सत्ताधारी गटातील नगरसेवक जयंत जाधव आणि मंगेश पवार यांचे खाऊकट्टा प्रकरणी सदस्यत्व रद्द झाल्याने पुन्हा पेचप्रसंग निर्माण झाला होता. याबाबत नुकत्याच पार पडलेल्या मनपाच्या अर्थसंकल्पीय बैठकीत दोघा नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द झाल्याची माहिती सभागृहाला दिली होती. त्याची इतिवृत्तात नोंद करून प्रादेशिक आयुक्त संजीव शेट्टण्णवर यांना पुन्हा प्रस्ताव पाठविल्यानंतर त्याला मंजुरी देण्यात आली.
दि. 15 रोजी महापौर-उपमहापौर निवडणूक होणार असून महापौरपद सामान्य तर उपमहापौरपद सामान्य महिलेसाठी राखीव आहे. त्यामुळे या पदांसाठी इच्छुकांची संख्या मोठी आहे. महापालिकेत भाजपचे 35 नगरसेवक होते. त्यापैकी दोघांचे सदस्यत्व रद्द झाल्याने हा आकडा 33 वर आला आहे. तसेच दोन अपक्ष नगरसेवकांचा भाजपला पाठिंबा असल्याने सध्या एकूण 35 नगरसेवक भाजपकडे आहेत. तर महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक व विरोधी गटाचे असे एकूण 27 नगरसेवक आहेत. तर 7 पदसिद्ध नगरसेवक आहेत. सध्या एकूण 63 मतदार महापौर-उपमहापौर निवडणुकीत मतदान करण्यास पात्र आहेत.
मतदारांची यादी देखील प्रादेशिक आयुक्तांना पाठविण्यात आली आहे. मात्र काँग्रेसकडून विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, प्रकाश हुक्केरी, नागराज यादव यांच्या नावाचा समावेश करण्यात यावा, असा प्रस्ताव सरकारला पाठविण्यात आला आहे. पण भाजपकडून यापूर्वीच राज्यपाल आणि सभापती बसवराज होरट्टी यांच्याकडे आक्षेप पत्र नेंदविण्यात आले आहेत. सध्या भाजपचे महापालिकेत बहुमत आहे. मात्र सत्ताधारी गटातच महापौर व उपमहापौर पदासाठी रस्सीखेच सुरू असल्याची चर्चा आहे. कारण सत्ताधारी गटातील तीन आणि एक अपक्ष अशा चार नगरसेवकांनी गोकाकचे आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेतल्याचीही माहिती उपलब्ध झाली आहे. याबद्दलची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात सुरू असून आमदार रमेश जारकीहोळी यांच्या एंट्रीमुळे महापौर-उपमहापौर निवडणुकीत रंगत निर्माण होण्याची शक्यता आहे.









