महापौर, आयुक्त यांच्याशी केली चर्चा
प्रतिनिधी/ बेळगाव
उत्तर मतदारसंघातील गरिबांना 128 घरे मंजूर झाली आहेत. मात्र गरिबांना त्याचे वाटप करणे गरजेचे आहे. याबाबत आमदार राजू सेठ यांनी महापालिकेतील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना काही सूचना व कार्यवाही करावी, असे सांगितले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आवास योजना आणि अटल बिहारी वाजपेयी आवास योजनेंतर्गत ही घरे मंजूर होणार आहेत. एकूण 128 जणांना ही घरे दिली जाणार आहेत. बरीच वर्षे उलटली तरी संबंधितांना अद्याप त्याबाबत पुढील कारवाईच केली गेली नाही. त्यामुळे आमदार राजू सेठ यांनी महापौर शोभा सोमणाचे, महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या उपस्थितीत चर्चा केली. तातडीने ही योजना पूर्णत्वाला न्यावी आणि गरिबांना घरांचा लाभ मिळवून द्यावा, असे त्यांनी सांगितले.
याचबरोबर लॅपटॉप गरिबांनाही द्यावेत, यासाठी सरकारकडून अधिक लॅपटॉपची मागणी करावी, असे महापौर शोभा सोमणाचे यांनी आमदार राजू सेठ यांना सांगितले. त्यावर निश्चितच सरकारकडे पाठपुरावा करू आणि लॅपटॉप गरीब विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. महापालिका उपायुक्त भाग्यश्री हुग्गी यांनी यावेळी विविध निर्माण झालेल्या समस्यांबाबत माहिती दिली.









