जत / किरण जाधव :
जतच्या सामान्य जनतेला विकास हवाय, याच मुदद्यावर त्यांनी मला ३८ हजारांच्या मताधिक्यांनी विधीमंडळात पाठवले आहे. त्यामुळे इथल्या प्रत्येक घटकाला आणि विकासाला प्राधान्य देणे माझे कर्तव्य आहे. कोण माझ्याविषयी काय बोलतोय, टीका करतोय यात फार स्वारस्य नाही. कारण मी दुष्काळी जतच्या रचनात्मक विकास परिवर्तनाची लढाई लढतोय, ती लोकसहभातून पुढे न्यायची आहे. असा निर्धार केलेल्या आ. गोपीचंद पडळकर यांनी रखडलेल्या जतेच्या विकासाची चाके गतिमान केली आहेत. विशेष म्हणजे पन्नास हजारावर लोकसंख्या असलेल्या जत शहरासाठी मंजूर केलेल्या ७८ कोटींच्या पिण्याच्या पाणी योजनेचा शुभारंभ आज पालकमंत्र्यांच्या हस्ते होत आहे.
‘विकासपूत्र’ या टॅगलाईनखाली २०२४ ची विधानसभा गोपीचंद पडळकर यांनी लढली आणि जिकलीही ! भूमीपूत्र विरुध्द विकासपूत्र अशा लढतीत लोकानी जतच्या विकासाला साथ देत असल्याचे सांगत पडळकरांना अगदी मोजक्या दिवसात मतांचे भरघोस दान टाकत त्यांना विधीमंडळात धाडले. तेंव्हापासून आ.गोपीचंद यांनी आपण ज्या विश्वासाने मला विजयी केले आहे, त्याला कुठेही तडा जावू न देता काम करण्याची ग्वाही दिली होती. त्यानुसार त्यांनी जतच्या विकासाची चाके गतिमान केली आहेत.
- पाणी योजना अनु जलताऱ्याचा नारा
पन्नास हजारांवर लोकसंख्या पोहचलेल्या जत शहराला राज्य शासनाच्या नगरोत्थान अभियानांतर्गत मंजुरी आणलेल्या ७८ कोटींच्या पिण्याच्या पाण्याचा भूमीपूजन सोहळा आज होत आहे. जत शहराचा वाढता विस्तार, लोकसंख्या विचारात घेता येथे पिण्याच्या पाण्याची योजना व्हावी, ही जतकरांची अनेक वर्षांपासूनची मागणी होती. शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बिरनाळ तलावात पाणी असूनही लोकांना केवल जीर्ण झालेल्या आणि अपुऱ्या योजनेमुळे आठ आठ दिवस पाण्यासाठी वाट पाहवी लागत होती. या योजनेला आ. गोपींचद पडळकरांनी मंजूरी मिळवली आणि प्रत्यक्ष कामालाही सुरूवात केली आहे. ही योजना साकारात असल्याने शहरवासियांनी आ. पडळकरांना थेट ‘जलताऱ्याची’ उपाधी देत त्यांच्या कामाचे कौतुक केले आहे.
- भुयारी गटर अन् पालिका इमारत
शहरातील सांडपाणी, कचऱ्याचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी येत्या कांही दिवसात सुमारे तीनशे कोटींची भुयारी गटर योजना देखील मंजूर करण्यात येत असल्याचा शब्द आ. पडळकरांनी दिला आहे. त्यादृष्टीने प्रशासन युध्दपातळीवर काम करत आहे. यासोबतच जतचा डीपीआर प्लॅन मंजूर करणे आणि पालिकेसाठी सुसज्ज इमारत या शहरातील दोन महत्वाच्या गोष्टींवर पडळकरांनी मोठा फोकस केला आहे.
विकासाची चाके गतिमान अवघ्या आठ ते दहा महिन्यांच्या कालावधीत जतच्या विकासाची चाके गतीमान करण्यात आ. पडळकर यांना मोठे यश येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या गुडबुकमधील ते नेते असल्याने जत तालुक्याला मोठं बळ मिळत आहे. अगदी निवडणुकीच्या काळातच त्यांनी उमदी येथे दोन हजार एकरांवर एमआयडीसीला मंजुरीघेतली आहे. त्यानंतर गेल्या अनेक वर्षांपासून तालुक्यातील प्रत्येक कुटुंब लखपती करणारा केंद्र व राज्य सरकारची नरेगा योजना कार्यन्वीत केली.
इतकेच नाहीतर जत हा राज्यातील नरेगाचा पायलट प्रोजेक्ट म्हणून घोषित करत तो ‘नंदादीप’ नावाने सुरू झाला आहे. एम. एच. ५९ नावानेही जतची आता ओळख बनते आहे. आरटीओचे कार्यालय मंजूर करत, त्याचा शुभारंभही येत्या कांही दिवसात घेण्यात येत आहे. त्याचसोबत संख, उमदी, बिळूर येथे नगर पंचायती आणि संख येथे स्वतंत्र पोलीस ठाणे करण्याच्या हालचाली राज्यस्तरावर आ. पडळकरांनी चालवल्या आहेत. यातून जतेच्या विकासाची चाके गतिमान होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
- आज विविध कामांचा शुभारंभ…
आ. गोपीचंद पडळकर यांच्या पुढाकाराने आज जतेत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते विविध विकासकामांचा शुभारंभ होत आहे. यात उमदी येथील पोलीस कर्मचारी निवासस्थाने, जाडर बोबलाद आरोग्य केंद्राचे लोकार्पण, वन विभागाची इमारत व निवासस्थान, शहर पाणी पुरवठा योजना, अशा कोट्यवधींच्या विकासकामांचा नारळ फोडण्यात येत आहे.








