मालवण । प्रतिनिधी
येथील बस स्थानकाच्या नवीन इमारतीसह सेल्फी पॉईंट हाय मास्ट यासह अन्य पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत नवीन बस स्थानक लवकरच सुरू केले जाणार आहे असे आमदार निलेश राणे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.येथील एसटी आगारास नव्याने उपलब्ध झालेल्या पाच एसटी बसेसचे लोकार्पण आज आमदार निलेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत, जिल्हा प्रमुख संजू परब, जिल्हा संघटक महेश कांदळगावकर, दीपक पाटकर, सुदेश आचरेकर, शहर प्रमुख बाळू नाटेकर, राजू बिडये, भाऊ मोर्जे, संदीप भोजने, युवती जिल्हा प्रमुख सोनाली पाटकर, युवा जिल्हा प्रमुख ऋतिक सामंत, आगार प्रमुख यांयासह अन्य अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.काही दिवसांपूर्वी येथील बसस्थानकाच्या जुन्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग एका महिलेच्या डोक्यावर पडला होता. यात संबंधित महिला गंभीर जखमी झाली होती. याची माहिती घेत आमदार राणे यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांसह जुन्या इमारतीची पाहणी केली. तसेच नव्या इमारतीचीही पाहणी केली. यानंतर पत्रकारांशी बोलताना श्री. राणे म्हणाले, बस स्थानकाच्या जुनी इमारत पाडण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नव्या इमारतीचे काम पूर्ण झाले असून त्याठिकाणी जुन्या इमारतीतील साहित्य नेण्याचे काम सुरू आहे. येत्या काही दिवसांत नव्या इमारतीसह सेल्फी पॉईंट, हायमास्ट यांसारख्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून देत नवे बसस्थानक प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल.









