वाकरे
करवीर मतदार संघाचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ करावे अशी मागणी केली.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके यांनी जिल्ह्याच्या काही प्रलंबित मागण्यांबद्द्ल भाष्य केले. कोल्हापूर येथे सर्वोच्च न्यायालयाचे खंडपीठ व्हावे, ही अनेक वर्षाची प्रलंबित मागणी पूर्णत्वास येण्यासाठी राज्य सरकारने पाऊले उचलावीत. केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे, राज्य शासनाने बँकेच्या सर्व व्यवहारात मराठी भाषेचा वापर करण्यात यावा. साखर आणि सूत हे महाराष्ट्रातील शेताकऱ्यांचे प्रमुख पिके आहेत, मात्र साखर उद्योग गेली अनेक वर्ष अडचणीत आहे. केंद्र सरकारने इथनॉल धोरण तसेच कोजनरेशन प्रकल्पला मंजुरी देऊन साखर उद्योगाला दिलासा दिला आहे, मात्र साखरेला ३१ रुपये हमीभाव दिला आहे, तो गेली ५ वर्ष वाढवलाच नाही. त्यामुळे साखरेला किमान ४० रुपये हमीभाव द्यावा, अशा अनेक मागण्यांबद्दल आमदार नरके यांनी भाष्य केले.
पुढे ते म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात महायुती सरकारने दावोस येथून महाराष्ट्रात करोडो रुपयांची गुंतवणूक आणली आहे. या गुंतवणुकीमुळे १५ लाख रोजगारांची निर्मिती होणार आहे, त्याठिकाणी मराठी तरुणांना प्राधान्य द्यावे. तसेच महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावाद कोर्टात असल्याने बेळगाव, निपाणी हा परिसर केंद्रशासित करावा, कर्नाटकतील सिमावासीयांना महाराष्ट्र सरकार आरोग्यसुविधा देतेच, पण त्यांच्या सोयीसाठी सीमाभागात महाराष्ट्राच्या हद्दीत चंदगड तालुक्यात आरोग्य कक्ष उभारण्यात यावा अशा विविध मागण्या चंद्रदीप नरके यांनी विधानभवनात मांडल्या आणि राज्यपालांचा अभिभाषणाला समर्थन देखील दिले.








