पुरावे नसल्याने एसआयटीकडून बी रिपोर्ट
प्रतिनिधी/ बेंगळूर
बेंगळूरमधील राजराजेश्वरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार मुनिरत्न यांना मोठा दिलासा मिळाला आहे. आरएमसी यार्ड येथील महिलेवरील अत्याचार प्रकरणात त्यांना क्लीनचिट मिळाली आहे. या प्रकरणाचा तपास केलेल्या एसआयटीने लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला आहे. पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार अत्याचारासंबंधी कोणतेही पुरावे नाहीत, त्यामुळे एसआयटीने न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला आहे. यामुळे मुनिरत्न यांना अत्याचार प्रकरणातील न्यायालयीन लढ्यात मोठे यश मिळाले आहे.
न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना मुनिरत्न म्हणाले, लोकसभा निवडणुकीत डी. के. सुरेश पराभूत झाल्यानंतर मला त्रास दिला जाऊ लागला. माझ्याविरोधात खोटा खटला दाखल करून तुरुंगात पाठविण्यात आले. माझी बदनामी करण्यासाठी पोस्टर्स लावले. एका महिलेला विधानपरिषद सदस्यत्व मिळाले नाही या कारणावरून कारस्थान करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
एका राजकीय पक्षाच्या महिला कार्यकर्त्याने दिलेल्या तक्रारीवरून मुनिरत्न यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल झाला होता. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एसआयटीच्या पथकाने लोकप्रतिनिधी विशेष न्यायालयात बी रिपोर्ट सादर केला आहे.
प्रकरण रद्द करण्याची उच्च न्यायालयाला विनंती
आपल्याविरुद्ध दाखल झालेले प्रकरण रद्द करावे, अशी याचिका आमदार मुनिरत्न यांनी उच्च न्यायालयात दाखल केली होती. सुनावणीवेळी युक्तिवाद करताना मुनिरत्न यांच्या वकिलांनी आरोप सिद्ध न झाल्याने एसआयटीने बी रिपोर्ट सादर केल्याची बाब उच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली. महिलेने गोळ्या सेवन करताना रिहर्सल केल्याचे आढळले आहे. 8 वेळा रिहर्सल करण्यात आले होते. मात्र, त्या महिलेच्या शरिरात झोपेच्या गोळ्यांचे अंश आढळलेले नाहीत. त्यामुळे पीडित महिलेने केलेल्या आरोपासंबंधी पुरावे नाहीत. त्यामुळे बी रिपोर्ट सादर झाला आहे. त्यामुळे मुनिरत्न यांच्याविरुद्धचे प्रकरण रद्द करावे, अशी विनंती केली आहे.









