तालुक्याच्या विविध गावांतून काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक-महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित
वार्ताहर /किणये
बेळगाव ग्रामीण काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी मंगळवारी भव्य शक्तिप्रदर्शनाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी तालुक्याच्या विविध गावांतून काँग्रेसचे कार्यकर्ते, समर्थक व महिला हजारोंच्या संख्येने उपस्थित होत्या. मंगळवारी सकाळी लक्ष्मी हेब्बाळकर यांनी हिंडलगा येथील गणपतीचे दर्शन घेतले. त्यानंतर सुळेभावी गावातील जागृत महालक्ष्मी देवी मंदिरात जाऊन विधिवत पूजा करून देवीचे दर्शन घेतले. त्यानंतर ज्योती कॉलेज रोड येथून भव्य शक्तिप्रदर्शनाला सुरुवात झाली. हजारो जनसमुदायाच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सजविलेल्या गाडीत लक्ष्मी हेब्बाळकर व वरिष्ठ नेतेमंडळी विराजमान झाली होती. यावेळी ढोल-ताशा व पारंपरिक वाद्यांचा गजर करण्यात आला. तहसीलदार कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करताना लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या समवेत आमदार सतीश जारकीहोळी, युवराज कदम आदी उपस्थित होते.









