मिरज :
मिरजेला मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. शहराला सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक वारसा आहे. वैद्यकीय नगरी, चळवळीचे शहर म्हणून देशात नावलौकीक आहे. अशा शहराला माजी पालकमंत्री, विद्यमान आमदार सुरेश खाडे यांनी मिनी पाकिस्तान म्हणणे निषेधार्ह आणि निंदनीय आहे. हा मिरजेच्या अस्मितेवरचाच घाला आहे. त्यामुळे खाडे यांनी तमाम मिरज मतदारसंघाची जाहीर माफी मागावी. अन्यथा जनक्षोभाला सामोरे जावे, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस विधान परिषदेचे आमदार इद्रिस नायकवडी यांनी पत्रकारांशी बोलताना दिला. नायकवडी यांनी नितेश राणे यांच्यावर मंत्रीमंडळातील बेजबाबदार मंत्री, असा आरोपही केला. दरम्यान, खाडे यांचा अनेक संघटनांकडून निषेध नोंदविण्यात आला.
सांगलीतील हिंदू गर्जना सभेत आमदार सुरेश खाडे आणि मंत्री नितेश राणे यांनी काही विधाने केली. त्यावर आमदार नायकवडी यांनी आज पत्रकार बैठकीत जोरदार प्रहार केला. मिरज विधानसभा मतदारसंघाचे चारवेळा प्रतिनिधीत्व आणि अडीच वर्षे पालकमंत्री राहिलेल्या सुरेश खाडे यांनी मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणून दोन समाजात विष पेरण्याचे, दुषित विचार पसरविण्याचे काम केले आहे. मिरजेच्या बाबतीत यापुढे असे विधान खपवून घेतले जाणार नाही. अशावेळी पक्ष, जात, भेद विसऊन मिरजकर एकत्र येतील. त्यावेळी त्यांना तोंड देणे खाडेंना अडचणीचे ठरेल, असा इशाराही नायकवडी यांनी दिला.
मिरज मतदारसंघात खाडेंची ही शेवटची टर्म आहे. त्यामुळे त्यांच्या तोंडून अशी प्रक्षोभक वक्तव्ये येऊ लागली आहेत. शहराला लागलेल्या दंगलीच्या गालबोटामुळे खाडे आमदार झाले. तेव्हापासून ते चार टर्म मिरजेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. पण त्यांना अद्याप मिरज समजलेच नाही. मंत्रीमंडळात स्थान नाही. पक्षपातळीवर अस्तित्व नाही. त्यामुळे खाडे भरकटले आहेत. मतदार संघाने त्यांना चारवेळा संधी दिली असताना मिरजेला मिनी पाकिस्तान म्हणून ते उल्लेख करतात. हे अतिशय दुर्दैवी आणि निंदनीयच आहे.
मिरजेत सर्व समाज गुण्यागोविंदाने नांदतो. तो बिघडविण्याचा उद्योग खाडे यांच्याकडून सुरू आहे. मिरज मिनी पाकिस्तान आहे. हे 2009 ला निवडणुकीला समजले नाही का? असा प्रश्न उपस्थित कऊन याच मतदार संघाचे 20 वर्षे प्रतिनिधीत्व करता याचे तरी भान ठेवा. असे सांगत नायकवडी यांनी मिरज ही आमची अस्मिता आहे. या अस्मितेवर घाला घालणाऱ्यांना माफी नाही. या वक्तव्याबद्दल तुम्ही जनतेची जाहीर माफी मागा. अन्यथा भविष्यातील जनक्षोभाला सामोरे जा. जोपर्यंत माफी मागणार नाही. तोपर्यंत कोणत्याही बाबतीत सहकार्य राहणार नाही, असेही नायकवडी म्हणाले.
मंत्रीमंडळातील बेजबाबदार मंत्री असा उल्लेख त्यांनी नितेश राणे यांच्याबाबत केला. कर्तृत्व नसताना सवंग लोकप्रियतेसाठी राणेंकडून भडक वक्तव्ये केली जातात. राज्यात सतत आपले नांव चर्चेत रहावे, यासाठी विशिष्ट समाजाला, धर्माला टार्गेट करण्याचा राणेंचा नेहमी प्रयत्न असतो. पण याचा काहीही जनतेवर परिणाम होत नाही, हे त्यांनी लक्षात ठेवावे. घटनेपेक्षा राणे निश्चितच मोठे नाहीत. असे म्हणताना नायकवडी यांनी राणेंच्या संगतीचा पfिरणाम खाडेंवर झाला, असा आरोप केला.
नायकवडींसह अनेकांकडून निषेध
आमदार सुरेश खाडे यांच्या वक्तव्याचा आमदार इद्रिस नायकवडींसह अनेकांकडून निषेध नोंदविला. यामध्ये जमिर सनदी युथ फौंडेशन, जैलाब शेख मित्र मंडळ यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अनेकांनी सोशल मिडीयावर आमदार खाडे यांच्या विरोधात राग व्यक्त करीत निषेध नोंदविला आहे. काहींनी तर आमदारकीच्या राजीनाम्यासह जाहीर माफीची मागणी केली आहे.








