पाऊस थांबल्यानंतर विकासकामे राबविणार
बेळगाव : समर्थनगर येथे अनेक नागरी समस्या असून त्या दूर करण्यासाठी शनिवारी बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी भेट दिली. परिसरातील रस्ते, गटारी तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था यासंदर्भात त्यांनी आढावा घेतला. त्यांच्यासोबत महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनीही समस्या जाणून घेत त्या दूर करण्यासाठीच्या सूचना अधिकाऱ्यांना केल्या. शहरापासून जवळ असणाऱ्या समर्थनगर येथे मागील अनेक वर्षांपासून नागरी समस्या जैसे थे आहेत. महिनाभरापूर्वी मुख्य मार्गावरच मोठा खड्डा पडल्यामुळे वाहतूक करणे अवघड झाले होते. महापालिकेकडून या ठिकाणी खडी टाकून तात्पुरत्या स्वरुपात रस्ता करून देण्यात आला. समर्थनगर येथील रस्ते अरुंद असल्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचत असल्याची तक्रार नागरिकांनी केली. याबरोबरच रस्ते करण्याची मागणी आमदारांकडे करण्यात आली. आमदार राजू सेठ यांनी सर्व परिसराचा आढावा घेत पावसाचा जोर कमी होताच विकासकामे राबविली जाणार असल्याचे सांगितले. यावेळी प्रकाश राऊत, काशी हिरेमठ, वसंत हलगेकर, पवन शिरोडकर, प्रद्युम्न बेकवाडकर, विजय जालगार यांच्यासह नागरिक उपस्थित होते.









