मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून प्रकृतीची विचारपूस
प्रतिनिधी /पणजी
सार्वेडेचे भाजप आमदार गणेश गावकर यांना श्रीलंकेतील इस्पितळात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याची माहिती गोवा प्रदेश भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे यांनी दिली. गावकर हे खासगी भेटीसाठी श्रीलंका दौऱयावर असून तेथे अचानक आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे इस्पितळात दाखल केले असून उपचार चालू असल्याचे सांगण्यात अ्नाले. त्यांची प्रकृती पूर्णपणे स्थीर झाल्यानंतरच त्यांना गोव्यात आणले जाईल, असे भाजपच्या सूत्रांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गावकर यांच्याशी फोनवर संपर्क करून विचारपूस केली असून त्यांच्यावर उपचार करणाऱया डॉक्टरांशीही मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली आणि गावकर यांच्या आरोग्याची माहिती घेतली. दरम्यान, गावकर यांचे पुत्र व कन्या श्रीलंकेला रवाना झाले असून त्यांच्याशी सातत्याने संपर्क ठेवण्यात येत आहे, असे तानावडे यांनी सांगितले. गावकर यांना श्रीलंका दौऱयात हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
गावकर यांना श्रीलंकेत इस्पितळात दाखल केल्याचे कळताच गोव्यातील त्यांचे हितचिंतक, कार्यकर्ते, मित्रमंडळी यांनी त्यांच्या कुटुंबियांकडे फोनवरून तसेच प्रत्यक्ष घरी जाऊन राजकीय क्षेत्रातील अनेक नेते, कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून कुटुंबियांना धीर दिला.