वृत्तसंस्था/ गुवाहाटी
आसाम विधानसभेत दीर्घकाळापासून देण्यात येत असलेला नमाज ब्रेक संपुष्टात आणल्याप्रकरणी एआययुडीएफ महासचिव रफीकुल इस्लाम यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच भाजप धार्मिक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
विधानसभेत 126 आमदारांपैकी 31 मुस्लीम आहेत. अशा स्थितीत त्यांना ब्रेक देणे काही मोठी गोष्ट नव्हती, परंतु भाजप आता धार्मिक प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करत आहे. आम्हाला शुक्रवारी एक ते दीड तासांचा ब्रेक दिला जात होता. यापूर्वीही भाजप, एजीपी अन् जनता दलाचे सरकार राहिले आहे, परंतु कुणालाच समस्या नाही, मागील अधिवेशनात भाजपनेच नियमांमध्ये बदल केला, तेव्हाही आम्ही विरोध केला होता असा दावा इस्लाम यांनी केला.
स्वत:चा धर्म सर्वांवर लादण्याची ही भाजप अन् संघाची विचारसरणी आहे. आम्ही नमाजासाठी गेल्यावरही विधानसभेचे कामकाज सुरू राहिले आणि आम्ही महत्त्वपूर्ण चर्चेत सामील होऊ शकलो नाही. आम्ही देखील विधानसभेचे सदस्य आहोत आणि महत्त्वपूर्ण चर्चांमध्ये सामील होऊ इच्छितो. परंतु दुसरीकडे नमाज पठण देखील आवश्यक आहे. आम्हाला चर्चेपासून वंचित केले जात आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी चांगला नाही असा दावा त्यांनी केला.









