ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राष्ट्रवादीतील फुटीनंतर हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी शरद पवार यांना पाठिंबा दिला. मात्र, अलिकडच्या काही दिवसांमध्ये चेतन तुपे हे अजित पवारांसोबत दिसत आहेत. हडपसरमध्ये आज अजित पवारांच्या स्वागताला तुपे यांनी हजेरी लावली. त्यानंतर एका सभेत ते अजित पवारांशेजारी बसले होते. यापूर्वीही त्यांनी दोन वेळा अजित पवारांची भेट घेतली होती. त्यामुळे चेतन तुपे नेमके शरद पवारांसोबत आहेत की, अजितदादांसोबत हा प्रश्न आता निर्माण झाला आहे.
अजित पवार आज पुणे दौऱ्यावर आहेत. हडपसरमध्ये फटाक्यांची आतिशबाजी करत, जेसीबीच्या सहाय्याने मोठा हार घालत अजित पवार यांचं स्वागत करण्यात आलं. त्यावेळी आमदार चेतन तुपे यांनी यावेळी अजितदादांच्या स्वागतासाठी हजेरी लावली. त्यानंतर एका कार्यक्रमात अजित पवार आणि चेतन तुपे शेजारी शेजारी बसले होते. यापूर्वीही दोन वेळा तुपे यांनी अजित पवारांची भेट घेतली होती. तुपे यांच्या या कृतीमुळे मतदारसंघातील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, आपण शरद पवारांसोबत आहात की अजित पवारांसोबत असा प्रश्न मीडियाने तुपेंना प्रश्न विचारला. त्यावर तुपेंनी प्रतिक्रिया देणे टाळले. त्यामुळे तुपे शरद पवारांची साथ सोडणार का? अशा चर्चांना आता राजकीय वर्तुळात उधाण आलं आहे.








