ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिरूरचे आमदार अशोक पवार यांनी वाबळेवाडी शाळेसंदर्भात विधानसभेत केलेल्या आरोपांवरुन ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. आ. पवार यांच्या वक्तव्यानंतर वाबळेवाडी ग्रामस्थांनी पालकसभा आणि ग्रामसभा घेत आ. पवार यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेतला. आ. पवार यांनी आता गावात पाऊल ठेवायचं नाही. तसेच यापुढे वाबळेवाडीसंदर्भात कोणतंही वक्तव्य केल्यास ते दिसतील तेथे त्यांच्या तोंडाला काळे फासू, असा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे.
आमदार अशोक पवार यांनी गुरुवारी विधानसभेत वाबळेवाडी शाळेचा मुद्दा मांडला होता. वाबळेवाडीची शाळा विद्यार्थ्यांकडून 25 हजार रुपये घेऊन शाळेत प्रवेश देते. शाळेचे मुख्याध्यापक आणि इतर दोन व्यक्ती हे पैसे घेत आहेत. सगळ्या धनिकांच्या मुलांना तिथे प्रवेश मिळतो, गोरगरिबांच्या मुलांना प्रवेश मिळत नाही. शाळेत स्थानिक मुले फक्त पंधरा ते वीस आहेत. सीएसआर मार्फत झालेल्या कामांचा हिशोब जिल्हा परिषदेला शाळेकडून दिला जात नाही, असे आरोप पवार यांनी केले होते.
आ. पवार यांच्या आरोपानंतर वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी पालकसभा आणि ग्रामसभा घेतली. आ. पवार यांनी विधानसभेत वाबळेवाडी शाळेचा प्रश्न चुकीच्या पध्दतीने मांडला. खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती देऊन आमदार पवारांनी वाबळेवाडीविरोधातील राग आळवला. आता त्यांना आमच्या गावात प्रवेश नाही, असा आक्रमक पवित्रा ग्रामसभेनंतर वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी घेतला.









