खानापूर : तालुक्याच्या पश्चिम भागाच्या विकासासाठी मी प्रयत्नशील आहे. खानापूर तालुक्याच्या दुर्गम भागातील दळणवळण, शिक्षण आणि वैद्यकीय सेवेला मी प्राधान्य देते. राजकारणविरहित विकास हेच माझे ध्येय असून शासनाकडे दुर्गम भागाच्या विकासासाठी कायम पाठपुरावा केला आहे. मात्र सरकारने म्हणावा तसा निधी न दिल्याने तसेच वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे दुर्गम भागाचा विकास रखडला आहे. मात्र मी या भागाच्या विकासासाठी कायम प्रयत्नशील राहीन, असे उद्गार आमदार अंजली निंबाळकर यांनी जांबोटी, कणकुंबी भागातील दौऱ्यावेळी आमटे येथे बोलताना व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लक्ष्मण कसर्लेकर हेते.
जांबोटी, कणकुंबी भागातील मान, सडा, हुळंद, हब्बनहट्टी या भागाचा दौरा करून या गावात महिला मेळावे घेऊन हळदी-कुंकू कार्यक्रम, महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दौरा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान येथील गणेश मंदिरात अंजली निंबाळकर या भजनात सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर हब्बनहट्टी येथे भेट देऊन हब्बहनट्टी येथील महिला मेळाव्याला संबोधित केले. यावेळी पारवाड ग्रा. पं. अध्यक्षा प्रियांका गावकर, लक्ष्मी घाडी, काळू नाईक, लक्ष्मी घाडी, रामा नाईक यासह पंचमंडळी व महिलावर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.









