विटा प्रतिनिधी
सत्ता संघर्षाचा निकाल आमच्या बाजूने लागेल याबाबत आत्मविश्वास होता. त्यामुळेच मी आज दिवसभर ही मतदारसंघात आणि लोकांच्यात होतो. सरकार स्थिर असल्यामुळे यापुढील काळात विकास कामांना गती देता येईल, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे सांगली जिल्ह्यातील एकमेव आमदार अनिल बाबर यांनी दिली आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालात आज सर्वोच्च न्यायालयाकडून शिंदे – फडणवीस सरकारला दिलासा दिला आहे. सत्ता संघर्षाच्या या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभेचे आमदार अनिल बाबर यांचाही यातील सोळा आमदारांच्या मध्ये समावेश होता. त्यामुळे आमदार बाबर यांचेही भवितव्य आज ठरणार होते. निकालने राज्यातील सरकार बरोबरच आमदार बाबर यांना मोठा दिलासा मिळाला आहे
याबाबत शिवसेना आमदार अनिल बाबर म्हणाले, मला विश्वास होता. आता कायद्याच्या कसोटीवर टिकण्यासाठी काही गोष्टी, काही त्रुटी झाल्या परंतु आम्ही काहीही चुकीचं केलेलं नाही. आता एवढ्या मोठ्या प्रक्रियेत काही गोष्टी ठरवून होत नसतात. अर्थात न्यायालयाच्या काही गोष्टी माझ्या कानावर आले आहेत परंतु मी काय प्रत्यक्ष बघितलेले नाही. मी दिवसभर आज लग्न वास्तुशांती वगैरे कार्यक्रमांमध्ये व्यस्त आहे. न्यायालयाच्या वेगवेगळ्या निरीक्षणाबाबत मी बोलणे उचित ठरणार नाही. त्यावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कायदेतज्ञ, घटनातज्ञ वगैरे बोलतील. विधानसभा अध्यक्षांकडे ज्यावेळी आमचा निर्णय असेल, त्यावेळी आमच्या सगळ्यांचं म्हणणे एकत्रित दिले जाईल, असेही आमदार बाबर यांनी सांगितले.
आमच्या 16 जणांचा विषय आता विधानसभा अध्यक्षांकडे गेला आहे. विधानसभा अध्यक्षांचा निकाल देखील अशाच पद्धतीने सकारात्मक येईल, अशी अपेक्षा आहे. त्या ठिकाणी आम्ही आमचे म्हणणे देणार आहोत, असेही आमदार बाबर म्हणाले.








