पत्रकार परिषदेत दिली माहिती, 30 संघांमध्ये होणार स्पर्धा
बेळगाव : विद्यार्थ्यांना न्यायालयातील कामकाजाचा अनुभव मिळावा या उद्देशाने कर्नाटक लॉ सोसायटीच्या राजा लखमगौडा लॉ कॉलेजच्यावतीने 13 वी एम. के. नांबियार मेमोरियल मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 10 ते 12 मार्च दरम्यान ही स्पर्धा रंगणार असून यामध्ये कर्नाटकासह पंजाब, उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, ओडिसा, उत्तराखंड, तामिळनाडू व गोवा येथील संघ सहभागी होणार असल्याची माहिती गव्हर्नींग कौन्सीलचे सदस्य आर. एस. मुतालिक यांनी सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली. टिळकवाडी येथील कॉलेजच्या के. के. वेणुगोपाल सभागृहात होणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन शुक्रवार दि. 10 रोजी सायंकाळी 5 वा. होणार आहे. कर्नाटक उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश ए. एस. पाच्छापुरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 12 मार्च रोजी दुपारी 2 वा. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अनिल कट्टी यांच्या उपस्थितीत अंतिम फेरी होणार आहे. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष न्यायालयीन कामकाज समजावे, दस्ताऐवज कसे तयार करायचे, त्याचे सादरीकरण या सर्वांची माहिती मिळावी या उद्देशाने स्पर्धा आयोजित केली आहे. यावर्षी 9 राज्यातील 16 संघ तर कर्नाटकातील 14 संघ सहभागी होणार आहेत. अशा एकूण 30 संघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे. विजेत्यांना अनुक्रमे 30 हजार, 20 हजार व बेस्ट मेमोरियल, बेस्ट स्पिकर, बेस्ट मुटर अशी पारितोषिके दिली जाणार असल्याची माहिती सेक्रेटरी एस. व्ही. गणाचारी यांनी दिली. यावेळी प्राचार्य डॉ. ए. एच. हवालदार, प्रा. अश्विनी परब यासह इतर उपस्थित होते.









