मुले अन् मुलींमध्ये नाही भेदभाव ः अहवालात दावा
वृत्तसंस्था / ऐझोल
मिझोरमला देशातील सर्वात आनंदी राज्य घोषित करण्यात आले आहे. या राज्यात मुले आणि मुलींदरम्यान भेदभाव केला जात नाही. येथील सामाजिक रचना तरुणाईला आनंद देणारी असल्याचा दावा गुरुग्रमाच्या मॅनेजमेंट डेव्हलपमेंट इन्स्टीटय़ूटमधील स्टॅटेजीचे प्राध्यापक राजेश पिल्लानिया यांनी स्वतःच्या अध्ययन अहवालाद्वार केला आहे. 100 टक्के साक्षरता प्राप्त करणाऱया दोन राज्यांमध्ये मिझोरमचा समावेश आहे. या राज्यातील विद्यार्थ्यांना विकासाची पुरेपुर संधी मिळत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
या अहवालादरम्यान आनंदीपणाची पातळी मोजण्यासाठी 6 मापदंड विचारात घेण्यात आले आहेत. यात कौटुंबिक संबंध, कामाशी संबंधित मुद्दे, सामाजिक मुद्दे, धर्म, कोरोना संकटाचा प्रभाव, शारीरिक अन् मानसिक आरोग्य यांचा समावेश आहे.

शिक्षकांची विद्यार्थ्यांशी उत्तम मैत्री
मिझोरममध्ये शिक्षक अन् विद्यार्थ्यांमध्ये मैत्रीचे उत्तम नाते निर्माण झाले असल्याचे अहवालात म्हटले गेले आहे. तेथील विद्यार्थी शिक्षकांना स्वतःचे सर्वात चांगले मित्र मानतात. तसेच शिक्षकांसमोर स्वतःचे म्हणणे मांडण्यास घाबरत तसेच संकोच करत नाहीत. मिझोरममध्ये शिक्षक नियमित स्वरुपात विद्यार्थी अन् त्यांच्या पालकांशी संवाद साधून उद्भवणाऱया समस्यांवर तोडगा काढतात. येथील विद्यार्थ्यांना कुठल्याही स्थितीत विकासाची संधी दिली जाते. या राज्यात अल्पउत्पन्न गटात मोडणाऱया कुटुंबातील मुलामुलींना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यास प्रोत्साहन दिले जाते.
शिक्षणासाठी दबाव कमी
मिझोरममधील पालनपोषण तरुणाईला तुलनेत अधिक आनंद देणारी आहे. तेथे जातरहित समाज असून शिक्षणासाठी आईवडिलांचा दबाव देखील कमी असल्याचे एका खासगी शाळेच्या शिक्षिकेने सांगितले आहे. मिझो समुदायातील प्रत्येक मुलगा किंवा मुलगी तुलनेत कमी वयातच पैसे कमाविण्यात सुरुवात करते. तेथे कुठल्याच कामाला दुय्यम मानण्याची पद्धत नाही. तसेच तरुण-तरुणींना सर्वसाधारपणे 16 किंवा वयाच्या 17 व्या वर्षी रोजगार मिळतो. योग्य वयात रोजगार मिळण्याच्या गोष्टीला येथे विशेष चालना दिली जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
आर्थिक स्वावलंबीपणा
मिझोरममध्ये विभक्त कुटुंबांची संख्या अधिक आहे, परंतु याचा प्रभाव मुलामुलींवर पडत नाही कारण ती कमी वयातच कमावू लागतात आणि त्यांच्याकडे रोजगाराच्या संधी असतात. तर काम करणाऱया महिला पतीपासून वेगळय़ा झाल्या तरीही आर्थिकदृष्टय़ा त्या प्रभावित होत नाहीत.









