वृत्तसंस्था/ सिकंदराबाद
येथे सुरु असलेल्या हॉकी इंडियाच्या 14 व्या उपकनिष्ठ महिलांच्या राष्ट्रीय हॉकी चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी पाचव्या दिवशी विविध सामन्यात मिझोराम, हरियाणा, महाराष्ट्र, बिहार आणि बंगाल यांनी शानदार विजय नोंदविले. सदर स्पर्धा सिकंदराबादमधील दक्षिण मध्य रेल्वेच्या क्रीडा संकुलामध्ये खेळवली जात आहे.
रविवारी खेळविण्यात आलेल्या इ गटातील पहिल्या सामन्यात मिझोरामने चंदीगडचा 4-1 अशा गोलफरकाने पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम राखली आहे. अ गटातील सामन्यात हरियाणाने मणिपूरचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. या सामन्यात हरियाणातर्फे दियाने 2 गोल तर मनजिंदर आणि निशू यांनी प्रत्येकी 1 गोल नोंदविला. च गटातील झालेल्या एका सामन्यात बंगालने पुडुचेरीचा 7-1 असा एकतर्फी पराभव केला. बंगालची कर्णधार बुलबुलकुमारी शॉने 3 गोल तर चक्रवर्ती आणि ओरो यांनी प्रत्येकी 2 गोल केले. मनस्वीने पुडुचेरीतर्फे 1 गोल केला. फ गटातील सामन्यात बिहारने जम्मू काश्मिरवर 5-0 असा विजय मिळवला. ग गटातील सामन्यात महाराष्ट्राने गुजरातचा 1-0 अशा गोलफरकाने निसटता पराभव केला. या सामन्यातील एकमेव गोल महाराष्ट्राच्या कर्णधार यशस्वी कुबडेने केला.









