वृत्तसंस्था/ बटुमी, जॉर्जिया
फिडे वर्ल्ड वुमन चेस कपच्या पहिल्या फेरीत भारताची महिला ग्रँडमास्टर वंतिका अग्रवाल हिला तुर्कमेनिस्तानच्या लीला शोहरादेवा हिने बरोबरीत रोखले. पहिल्या दिवशी फारसे आश्चर्यजनक असे निकाल पाहायला मिळाले नाहीत आणि 86 खेळाडू दुसऱ्या फेरीत पोहोचण्यासाठी स्पर्धेत उतरले.
या स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडू प्रतिष्ठित कँडिडेट्स स्पर्धेसाठी पात्र ठरतील. भारताच्या कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांना त्यांच्या रेटिंगच्या आधारे दुसऱ्या फेरीत थेट प्रवेश मिळाला आहे आणि इतर पाच भारतीय युवतींना पहिल्या दिवशी मिश्र निकाल पाहायला मिळाले. वंतिका हिला तुर्कमेनिस्तानच्या लीला शोहरादेवाविऊद्ध बऱ्याच संधी मिळाल्या होत्या. परंतु तिची समीकरणे लढतीच्या मधल्या टप्प्यात फारशी चालली नाहीत आणि पारडे समान प्रमाणात झुकलेले राहिले. लढत अनिर्णित अवस्थेकडे वाटचाल करत आहे हे नंतर स्पष्टपणे जाणवले.
माजी राष्ट्रीय महिला विजेत्या पद्मिनी राऊत आणि पी. व्ही. नंदीधा यांनी त्यांचे सलामीचे सामने जिंकले तर किरण मनीषा मोहंती आणि के. प्रियांका स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत. राऊतने चीनच्या झांग लिनिनला हरवताना उत्तम प्रयत्न केले, तर नंदीधाने इक्वेडोरच्या ऑर्टिज व्हेर्डेझोटो अनाहीला हरवले. दुसरीकडे, युक्सिन साँगने मोहंतीला हरवले, तर हंगेरीच्या झ्सोका गालने प्रियांकावर विजय मिळवला. 64 खेळाडूंच्या फेरीत कोण पोहोचेल हे ठरवण्यासाठी दुसरा गेम आणि टायब्रेक खेळवला जाईल. या स्पर्धेत एकूण 6,91,250 अमेरिकन डॉलर्सची बक्षिसे ठेवण्यात आलेली आहेत.









