क्रीडा प्रतिनिधी/ मडगाव
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॉक्सिंग क्रीडाप्रकारातील पहिल्या दिवशी यजमान गोव्याला संमिश्र यश प्राप्त झाले. पेडे क्रीडा संकुलातील बॉक्सिंग बाऊटमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे.
गोव्याच्या बॉक्सर्सनी काल चार लढती जिंकल्या तर एका बाऊटमध्ये पराभव स्वीकारला. एलीट पुरूषांच्या लाईटवेट विभागातील 75-80 किलो वजनी गटात गोव्याच्या लोकेशने शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविताना अरुणाचल प्रदेशच्या रिराम गोजूमला सहज पराभूत केले.
महिलांच्या एलीट 52 ते 54 किलो वजनीगटातील बँटमवेट विभागात गोव्याच्या सुमन यादवला पराभव स्वीकारावा लागला. तिला राजस्थानच्या खनाम अर्शी हिच्याकडून 4-1 असे पराभूत व्हावे लागले. 52 ते 54 किलो वजनीगटातील लाईटवेट विभागात गोव्याच्या निहारिकाने आसामच्या बार्बी गोगोयचा 5-0 असा पराभव केला. एलीट पुरूषांच्या 86 ते 92 किलो वजनीगटातील हॅव्हीवेट विभागात गोव्याच्या साई आयुषने आक्रमक खेळी करताना तामिळनाडूच्या वेथांपचा 5-0 असा सहज पराभव केला.









