उच्च न्यायालयाच्या स्थगितीचा संपावर परिणाम : मध्यवर्ती बसस्थानकातून विविध मार्गांवर धावल्या बसेस, प्रवाशांची प्रचंड गैरसोय
बेळगाव : राज्य परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. पण उच्च न्यायालयाने एक दिवसाची स्थगिती दिल्याने कर्मचारी काहीसे गोंधळात पडले होते. मात्र स्थगिती न जुमानता संपावर जाण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून दैनंदिन बससेवेनुसार बस सुरू करण्यात आल्या नव्हत्या. पण 50 टक्के बसेस विविध मार्गांवर सोडण्यात आल्या होत्या. याचा विद्यार्थ्यांसह नागरिकांवरही परिणाम झाल्याचे दिसून आले. उच्च न्यायालयात संपाबाबत सुनावणी होणार असल्याने यावरच संपाची रुपरेषा ठरणार आहे. परिवहन कर्मचाऱ्यांनी आपल्या तीन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्यांसाठी मंगळवारपासून संपावर जाण्याचा निर्णय घेतला. यामुळे याचा नागरिकांवर परिणाम होऊ नये, यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली होती. मात्र ही बैठक निष्फळ ठरली. यातच उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. यामुळे गोंधळलेले कर्मचारी कामावर रुजू झाले. परिणामी बेळगाव विभागाचे 50 टक्के कर्मचारी कामावर रुजू झाले होते. कर्मचाऱ्यांच्या संख्येनुसार विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या होत्या.
कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण
मंगळवार सकाळपासूनच मध्यवर्ती बसस्थानकात संपाचे सावट दिसून येत होते. संप असला तरी नागरिक नेहमीप्रमाणे आपल्या कामानिमित्त बाहेर पडले होते. मात्र अपुऱ्या बसेसमुळे नागरिकांना समस्या आल्याचे दिसून आले. काही विद्यार्थी शाळा, महाविद्यालयाला जाण्यासाठी नियमितरित्या आले होते. तर काही विद्यार्थी संपामुळे घरात होते. तरीही मंगळवार सकाळपासून बसस्थानकात गर्दी असल्याचे दिसून आले. उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याने कर्मचाऱ्यांसह नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाल्याचे पहावयास मिळाले.
गोवा, महाराष्ट्रातही धावल्या बसेस
मध्यवर्ती बसस्थानकातून कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीनुसार विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या होत्या. स्थानिक, लांबपल्ल्यासह इतर राज्यातही बसेस सोडण्यात आल्या होत्या. गोवा, महाराष्ट्र राज्यात काही प्रमाणात बसेस धावत होत्या. तर निपाणी, चिकोडी, हुक्केरी, गोकाक, बैलहोंगल, बागलकोट, हुबळी, धारवाड, तालीकोट, विजापूर आदी मार्गांवर काही बसेस धावत असल्याचेही पहावयास मिळाले. तसेच स्थानिक विविध मार्गांवर बसेस धावत होत्या.
नागरिकांनी लांबपल्ल्याचा प्रवास टाळला
संपाच्या पार्श्वभूमीवर बसस्थानकात नेहमीप्रमाणे गर्दी नसल्याचे दिसून आले. संप असल्याने नागरिकांनी लांबपल्ल्याचा प्रवास टाळला होता. मात्र स्थानिक मार्गांवरील बसेसमध्ये सकाळी नागरिकांसह विद्यार्थ्यांनी गर्दी केल्याचे दिसून आले. मात्र दुपारनंतर दुसऱ्या शिफ्टमध्ये कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांची निश्चितता नसल्याने काही बसेसमधील प्रवाशांना उतरविल्याचेही दिसून आले. यामुळे प्रवाशांना इतर बसचा आधार घेऊन प्रवास करावा लागला. यामुळेही प्रवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला होता.
चोख पोलीस बंदोबस्त
कर्मचारी संपावर जाणार असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सकाळपासूनच बसस्थानकातील विविध ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. यामुळे मध्यवर्ती बसस्थानकाला काही प्रमाणात छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. परिवहन खात्याच्या अधिकाऱ्यांशी समन्वय साधून पोलिसांकडून बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले होते.
नागरिकांना समस्या होणार नाहीत याची काळजी घेणार
नागरिक व विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या समस्या होऊ नयेत, यासाठी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कामावर रुजू होण्याबाबत विनंती करण्यात आली होती. याला प्रतिसाद देत 50 टक्के कर्मचारी कामावर हजर झाले होते. तसेच मध्यवर्ती बसस्थानकातून इतर राज्यात, लांबपल्ल्यासह स्थानिक विविध मार्गांवर बसेस सोडण्यात आल्या. बुधवारपासून नागरिकांना समस्या होऊ नयेत, याचीही काळजी घेण्यात येणार असल्याचे वरिष्ठ विभागीय नियंत्रणाधिकारी राजेश हुद्दार यांनी सांगितले.
-वरिष्ठ विभागीय नियंत्रणाधिकारी राजेश हुद्दार










