बाजारपेठ, बससेवेवर परिणाम : तामिळनाडूला पाणी पुरवठा करण्यास शेतकऱ्यांचा विरोध
बेळगाव : कावेरी नदीचे पाणी तामिळनाडूला देण्यास विरोध करत शुक्रवारी पुकारलेल्या बंदला शहरात संमिश्र प्रतिसाद मिळाला. मंगळवारी बेंगळूर बंद यशस्वी करण्यात आला होता. त्या पाठोपाठ राज्य बंदची हाक देण्यात आली होती. त्यामुळे शुक्रवारी बाजारपेठ, बस वाहतूक आणि काही घटकांवर त्याचा परिणाम झाला. कावेरी नदीचे पाणी देण्यास विविध संघटनांनी विरोध केला आहे. यापूर्वी तामिळनाडूला पाण्याचा पुरवठा करण्यात आला होता. मात्र पावसाअभावी कर्नाटक राज्यातच दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे तामिळनाडूला पाणी पुरवठा करण्यास स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला आहे. याला भाजप आणि निजद यांनीदेखील पाठिंबा दिला आहे. अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशीच राज्य बंदची हाक देण्यात आली आहे. त्यामुळे शहरातील वर्दळ कमी झाली होती. विशेषत: बाजारात स्टेशनरी, कपडे आणि इतर व्यावसायिकांची काही दुकानेही बंद होती. तर काही व्यापारी आणि व्यावसायिकांनी स्वत:हून दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे बंदचा बाजारपेठेवर देखील परिणाम झाला.
बससेवेवर परिणाम
राज्यभर पुकारलेल्या बंदमुळे मध्यवर्ती बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कमी झाली होती. विविध ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांची वर्दळ कमी झाली होती. त्यामुळे बस स्थानकात काही बसेस जाग्यावर थांबून होत्या. एरवी हजारो प्रवाशांनी गजबजणाऱ्या बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कमी पहायला मिळाली. त्यामुळे बंदचा बससेवेवर काहीसा परिणाम झाला.









