उत्तर कर्नाटकच्या वाट्याला अत्यंत कमी निधीची तरतूद केल्याने नाराजी
बेळगाव : मागील काही दिवसांपासून सर्वांचे लक्ष लागून असलेला कर्नाटक विधिमंडळाचा अर्थसंकल्प शुक्रवारी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी सादर केला. सर्वसमावेशक असा हा अर्थसंकल्प असला तरी विरोधकांनी मात्र यावर टीका केली आहे. त्यातच उत्तर कर्नाटकच्या वाट्याला अत्यंत कमी निधीची तरतूद केली गेली असल्याने नाराजीही व्यक्त होत आहे. परंतु, त्याचबरोबर बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद करण्यात आल्याने हा रेल्वेमार्ग लवकरच पूर्णत्वाला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
शेतकऱ्यांसाठी बजेटमध्ये दिलासा

शेतकऱ्यांसाठी या बजेटमध्ये दिलासा देण्यात आला आहे. असे असले तरी तळागाळातील जनतेला मात्र म्हणावा तसा दिलासा मिळाला नसल्याचे दिसून येत आहे. कारण कर्ज वितरणामध्ये वाढ केली तरी ती सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहोचेल की नाही, याची शाश्वती नाही. याचबरोबर मध्यमवर्गीयांसाठी विशेष असे काहीच करण्यात आले नाही. सर्वसमावेशक असा अर्थसंकल्प जाहीर करण्यात आला आहे. निवडणूक असल्यामुळे भरघोस अशी तरतूद दाखविण्यात आली तरी तितकी रक्कम वितरित करणे अवघड जाण्याची शक्यता दिसून येत आहे.
– अॅड. विनय मांगले (कर्नाटक राज्य बार असोसिएशन उपाध्यक्ष)
सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार

कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी सर्व क्षेत्रांचा विचार करून एक उत्तम अर्थसंकल्प सादर केला आहे. शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या कर्जामध्ये वाढ केली आहे. पदवीपूर्व व सरकारी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण, वैद्यकीय महाविद्यालयांसाठी 500 कोटींची तरतूद, नोकरदारांच्या करामध्ये वाढ, तसेच जीएसटी प्रक्रिया सुलभ होण्यासाठी उत्तम योजना आखली असल्याने सर्वसामान्यांसाठी हा अर्थसंकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
– जितेश कब्बूर (टॅक्स कन्सल्टंट)
बेळगावच्या विकासाला हातभार लागण्यासाठी निधीची तरतूद

उद्योग, शिक्षण, गुंतवणूक, विकास या सर्व गोष्टींचा विचार करून अर्थसंकल्प सादर करण्यात आला. बेळगावच्या विकासाला हातभार लागण्यासाठी बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गासाठी निधीची तरतूद केली आहे. त्याचबरोबर राज्यामध्ये औद्योगिक विकासासाठी नऊ ठिकाणी क्लस्टर उभारणी केली जाणार आहे. त्यापैकी एक बेळगावपासून जवळ असणाऱ्या कणगला येथे औद्योगिक वसाहत उभारली जात असून याचा फायदा जिल्ह्याला होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
– राजकुमार खोडा (व्यावसायिक)
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर खटाटोप

मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी शुक्रवारी मांडलेला अर्थसंकल्प बिनबुडाचा आहे. केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेला हा खटाटोप आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी कोणतेच कार्यक्रम जाहीर केले नाहीत. वाढत्या भ्रष्टाचारावर आळा घालण्यासाठी उपक्रम नाहीत. साऱ्यांच्याच नाकाला तूप लावण्याचे प्रयत्न करण्यात आले आहे. या अर्थसंकल्पामुळे गरीब, मध्यमवर्गीयांना कोणताही फायदा होणार नाही. एमएसएमआयची स्थापना करून उद्योग क्षेत्रात गुंतवणूक वाढविण्यासंबंधी दूरदृष्टी दाखविली नाही, याचेच आश्चर्य वाटते. अर्थसंकल्पात याचा उल्लेखही नाही.
– लक्ष्मी हेब्बाळकर (काँग्रेस आमदार)
सर्वसामान्य लोकांच्या कानावर फूल

कृषी, ग्रामीण विकासाला महत्त्व दिलेले नाही. जुन्याच योजना नव्या स्वरुपात सादर केल्या आहेत. एकंदर पाहता अर्थसंकल्पाच्या नावाने सर्वसामान्य लोकांच्या कानावर फूल ठेवण्याचे काम सरकारने केले आहे.
– चन्नराज हट्टीहोळी (काँग्रेस आमदार)
सर्वांगीण प्रगतीसाठी उत्तम बजेट

सर्वांगीण प्रगतीसाठी हे उत्तम बजेट आहे. बजेटमध्ये पायाभूत सुविधा, संरक्षण शिक्षण व संशोधन क्षेत्रासाठी विशेष निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. यामुळे नवीन उद्योगधंद्यांना चालना मिळेल. तसेच नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार आहेत. सर्व सामान्यांसाठी आयकरात विशेष सवलती देण्यात आल्या आहेत. नवीन करप्रणालीवर भर दिला आहे. जुनी करप्रणाली ऐच्छिक केली आहे. बजेट देशाला आर्थिकदृष्टय़ा प्रगतिपथावर नेणारे आहे.
– राजेंद्र केळकर
अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी बिनकामाचा

मागील दोन वर्षात कोरोना, अतिवृष्टी आणि नैसर्गिक संकटामुळे शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. अशा परिस्थितीत राज्यात शेतकऱ्यांची परिस्थिती हलाखीची बनली आहे. राज्य सरकारने अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी कोणतीच महत्त्वाची तरतूद केलेली नाही. त्यामुळे हा अर्थसंकल्प शेतकऱ्यांसाठी बिनकामाचा आहे. शिवाय शेतकऱ्यांच्या कर्जाविषयी आणि हितासंबंधी महत्त्वाची तरतूद नाही.
– भरमा अलगोंडी (शेतकरी चलवेनहट्टी)
शासकीय रिक्त जागा भरण्याविषयी कोणतीच तरतूद नाही

राज्यात बेरोजगारी पसरली आहे. बेरोजगारीची समस्या शहर आणि ग्रामीण भागातदेखील वाढली आहे. ती सुशिक्षित लोकांना सतावू लागली आहे. मात्र, अर्थसंकल्पात शासकीय रिक्त जागा भरण्याविषयी कोणतीच तरतूद केली नाही. एकूण राज्याचा अर्थसंकल्प तरुणांसाठी अत्यंत निराशाजनक आहे. सादर केलेल्या अर्थसंकल्पावर तरुणांनी विसंबून न राहता आपल्या हक्कासाठी लढा देणे आवश्यक आहे.
– राजू गाणगी (ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशन, जिल्हा संचालक)
सर्वसमावेशक अर्थसंकल्प

अर्थसंकल्पात विविध विभागनिहाय तरतुदी केल्या आहेत. शिक्षणासाठी 3 लाख 79 हजार 560 कोटी रुपये भरीव तरतूद करण्यात आली आहे. शिक्षण, जलसंपदा, ग्रामीण विकास, नगरविकास, आरोग्य विभागासाठी भरीव तरतूद केली आहे. महाविद्यालयीन मुलींना मोफत बसपास देण्याची घोषणा मुख्यमंत्री बोम्माई यांनी केली आहे. हा अर्थसंकल्प सर्वसमावेशक आहे.
– डॉ. सोनाली सरनोबत









