राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत शेतकऱ्यांना प्रोत्साहन
बेळगाव : शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने कृषी खात्याने विशेष पावले उचलली आहेत. यंदाच्या हंगामात राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत आंतरपीक (मिश्रपीक) पद्धतीला प्राधान्य दिले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात मिश्रपीक डोलणार आहे जिल्ह्यातील 4 लाख हेक्टर क्षेत्रात मिश्रपीक घेण्यासाठी कृषी खात्याने तयारी केली आहे. जिल्ह्यात ऊस, भात, सोयाबीन, मका, ज्वारी, गहू, तंबाखू आदी पिके घेतली जातात. या पिकांमध्येच मिश्रपीक घेण्यासाठी प्रोत्साहन दिले जाणार आहे. विशेषत: ऊस पिकांमध्येच मका, ज्वारी, गहू आणि इतर पिके घेतली जाणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचा मशागत आणि इतर खर्चही वाचणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनाही मिश्रपीक उपयुक्त ठरणार आहे.
पावसाचा अनिश्चितपणा, खताचे वाढते दर, वाढती मजुरी, नैसर्गिक संकटे आदी कारणांमुळे शेती अडचणीत आली आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना मिश्रपीक पद्धत आधार ठरणार आहे. यासाठी बी-बियाणे खते आणि किटकनाशके, खात्याकडून पुरविली जाणार आहेत. यामध्ये सेंद्रीय खत आणि संकरित बी-बियाण्यांचा समावेश राहणार आहे. याबरोबर बागायत शेतींमध्येही मिश्रपीक घेण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. मका, गहू, हरभरा, सोयाबीन, सूर्यफूल आदी पिकांचा मिश्रपीक म्हणून समावेश होणार आहे. अलीकडे कमी जागेत आंतरपीक घेण्यासाठी मिश्रपीक पद्धतीला महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे कमी जागेत आणि कमी खर्चात एकाच वेळी दोन पिके घेतली जात आहेत. विशेषत: ऊस पिकात सूर्यफूल आणि इतर पिकांची लागवड केली जाणार आहे. त्याबरोबर भाजीपाल्यांचीही लागवड केली जाणार आहे.
संकरित बियाणांचा वापर होणार
राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेंतर्गत मिश्रपीक पद्धतीने लागवड करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. बी-बियाणे खते आणि इतर गोष्टींची बचत होणार आहे. मिश्रपीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले जाणार आहे. यासाठी संकरित बियाणांचा वापर होणार आहे.
– शिवनगौडा पाटील (सहसंचालक कृषी खाते)









