न्यूझीलंड-लंका पहिली कसोटी : हेन्रीचे अर्धशतक, टिकनेरचे तीन बळी
वृत्तसंस्था/ ख्राईस्टचर्च
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील येथे सुरू असलेल्या पहिल्या कसोटीतील शनिवारी खेळाच्या तिसऱ्या दिवशी यजमान न्यूझीलंडने लंकेवर पहिल्या डावात नाममात्र 18 धावांची आघाडी मिळवली ती केवळ डॅरिल मिचेलच्या शतकामुळेच. तिसऱ्या दिवशीचा खेळ संपला त्यावेळी लंकेने दुसऱ्या डावात 3 बाद 83 धावा जमवत न्यूझीलंडवर 65 धावांची बढत मिळवली आहे.
सदर कसोटी मालिका आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप अंतर्गत होत आहे. या पहिल्या कसोटीत लंकेचा पहिला डाव 355 धावांवर समाप्त झाला. त्यानंतर न्यूझीलंडने 5 बाद 162 या धावसंख्येवरून तिसऱ्या दिवशीच्या खेळाला पुढे प्रारंभ केला. त्यांच्या शेवटच्या पाच गड्यांनी 211 धावांची भर घातली. न्यूझीलंड संघातील डॅरिल मिचेलने 193 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 102 धावा झळकवल्या. दुसऱ्या दिवसाअखेर नाबाद राहिलेला ब्रेसवेल जयसुर्याच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने 2 चौकारासह 25 धावा केल्या. कर्णधार टीम साऊदीने 20 चेंडूत 1 षटकार आणि 3 चौकारासह 25 धावा केल्या. रजिताने त्याला कुमाराकरवी झेलबाद केले. डॅरिल मिचेल आणि मॅट हेन्री या जोडीने न्यूझीलंडचा डाव सावरताना आठव्या गड्यासाठी 56 धावांची भर घातली. मिचेल नवव्या गड्याच्या रुपात बाद झाला. कुमाराने त्याला डिक्वेलाकडे झेल देण्यास भाग पाडले. मिचेल बाद झाल्यानंतर मॅट हेन्रीला वेगनरकडून चांगली साथ मिळाली. या जोडीने नवव्या गड्यासाठी 69 धावांची भागीदारी केल्याने न्यूझीलंडला 350 धावांचा टप्पा ओलांडता आला. हेन्रीने 75 चेंडूत 3 षटकार आणि 10 चौकारासह 72 धावा झळकवल्या. वेगनरने 24 चेंडूत 3 षटकार आणि 1 चौकारासह 27 धावा जमवल्या. न्यूझीलंडचा पहिला डाव 107.3 षटकात 373 धावात आटोपला. लंकेतर्फे असिता फर्नांडोने 4, कुमाराने 3, तर रजिताने 2 व जयसुर्याने एक गडी बाद केला.
केवळ 18 धावांनी पिछाडीवर असलेल्या लंकेने आपल्या दुसऱ्या डावाला सावध सुरुवात केली. न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज टिकनेरने आपल्या अचूक गोलंदाजीच्या जोरावर लंकेच पहिले तीन महत्त्वाचे फलंदाज बाद केले. त्याने कर्णधार करुणारत्नेला तसेच ओशादा फर्नांडो आणि कुशल मेंडिस यांचे बळी मिळवले. करुणारत्नेने 1 चौकारासह 17, ओशादा फर्नांडोने 4 चौकारासह 28, कुशल मेंडिसने 1 चौकारासह 14 धावा जमवल्या. मॅथ्यूज 20 तर जयसुर्या 2 धावावर खेळत आहेत. न्यूझीलंडतर्फे टिकनेरने 28 धावात 3 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक : लंका प. डाव सर्वबाद 355, न्यूझीलंड प. डाव 107.3 षटकात सर्वबाद 373 (मिचेल 102, लॅथम 67, कॉन्वे 30, ब्रेसवेल 25, साऊदी 25, हेन्री 72, वेगनर 27, असिता फर्नांडो 4-85, कुमारा 3-76, रजिता 2-104, जयसुया 1-46), लंका दु. डाव 38 षटकात 3 बाद 83 (ओशादा फर्नांडो 28, करुणारत्ने 17, मेंडिस 14, मॅथ्यूज खेळत आहे 20, जयसुर्या खेळत आहे 2, टिकनेर 3-28).









