टी 20 विश्वचषकापूर्वीच कांगारुंना धक्का : कसोटी, वनडेत मात्र खेळत राहणार
वृत्तसंस्था/ सिडनी
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्डकपपूर्वी त्याने हा मोठा निर्णय घेतल असून ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटला प्राधान्य देण्याच्या उद्देशाने त्याने टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला निरोप देण्याचा निर्णय घेतला आहे.
स्टार्क अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये गतवर्षी झालेल्या टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमध्ये खेळलेला नाही. ‘टेस्ट क्रिकेट माझ्यासाठी नेहमीच पहिले प्राधान्य राहिले आहे. ऑस्ट्रेलियासाठी खेळलेल्या प्रत्येक टी-20 सामन्याचा मी आनंद घेतला, विशेषत: 2021 च्या वर्ल्डकपचा. फक्त आपण जिंकलो म्हणूनच नाही, तर आमच्याकडे एक जबरदस्त संघ होता आणि त्या स्पर्धेत खेळताना आम्हाला मजा आली. आगामी काळातील भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, अॅशेज मालिका आणि 2027 चा वनडे वर्ल्डकप लक्षात घेता, या मोठ्या स्पर्धांसाठी फिट आणि सर्वोत्तम कामगिरी राखण्यासाठी हा निर्णय घेणे मला योग्य वाटल्याचे त्याने सांगितले.
टी 20 मधील यशस्वी गोलंदाज
मिचेल स्टार्क हा त्याच्या कमालीच्या स्विंगसाठी ओळखला जातो. स्टार्कने 2012 मध्ये आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्याने 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे प्रतिनिधित्व केले. यादरम्यान त्याने 23.81 च्या सरासरीने 79 विकेट घेतल्या. टी-20 स्वरूपात ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो दुसऱ्या स्थानी आहे.
प्रतिक्रिया
टेस्ट आणि वनडेवर अधिक लक्ष केंद्रित करण्यासाठी आपण टी 20 क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. अर्थात, आंतरराष्ट्रीय टी 20 क्रिकेटमधून जरी निवृत्ती स्वीकारली असली तरी आयपीएल व व्यावसायिक टी 20 लीगमध्ये मात्र आपण खेळत राहणार आहे.
मिचेल स्टार्क, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज









