मौजमजेसाठी गेले खानापूरच्या जंगलात : हेस्कॉमची नामुष्की
बेळगाव : सरकारी वाहनाचा दुरुपयोग झाल्यास किती मोठा गोंधळ उडू शकतो, याची प्रचिती रविवारी बेळगावमध्ये आली. हेस्कॉममधील एमआरटी विभागाच्या अधिकाऱ्यांसाठी असणारे वाहन चालकाने मौजमजेसाठी वापरल्याने हेस्कॉमवर नामुष्की ओढवली. त्यामुळे यापुढील काळात तरी सरकारी वाहनांचा गैरवापर थांबणार का? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने अनेकजण खानापूर येथे निसर्गाचा आनंद घेण्यासाठी गेले होते. मागील आठवड्यात झालेल्या धुवांधार पावसामुळे जिल्हाधिकारी डॉ. नितेश पाटील यांनी खानापूर तालुक्यातील धबधब्यांवर बंदीचे आदेश दिले होते. हे आदेश धुडकावत काहीजण खानापुरातील घनदाट जंगलात शिरले होते.
सर्वांना समान न्याय द्या
जंगलामध्ये जाऊन मद्यपान करणे, मांसाहार पदार्थ शिजविणे असे प्रकार करीत होते. याची माहिती स्थानिक नागरिक व वनविभागाला समजली.घटनास्थळी दाखल झाल्यानंतर ते वाहन हेस्कॉमचे असल्याचे समोर आले. त्यामुळे सामान्य नागरिकांना एक तर सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दुसरा न्याय का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत होते. त्यातच जंगलातील एका गावात विद्युत दुरुस्तीचे काम असल्याचे सांगून वाहन आत शिरल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. सदर व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असल्यामुळे हेस्कॉमची नामुष्की झाली आहे. त्यामुळे सरकारी वाहनांचा दुरुपयोग टाळण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हे वाहन कंत्राटी पद्धतीने अधिकाऱ्यांना वापरण्यासाठी दिले जाते. रविवारी साप्ताहिक सुटी असल्याने वाहनचालकाने आपल्या मित्रांसोबत ते वाहन खानापूर येथे घेऊन गेले होते. त्यामुळे तसे पाहिल्यास त्या घटनेशी हेस्कॉमचा थेट संबंध नाही. परंतु, वाहनावरील हेस्कॉमचा बोर्ड तसाच असल्यामुळे गैरप्रकार होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा प्रकारांना आळा घालणे गरजेचे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून गंभीर दखल
जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश धुडकावत काही युवक खानापूर तालुक्यातील भटवाडी परिसरातील धबधब्यावर गेले होते. संबंधितांवर वनविभागाने एफआयआर दाखल केला आहे. बंदीचे आदेश असतानाही जंगलात मौजमजा करण्यासाठी गेलेल्या चार तरुणांवर यापूर्वीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या व्यतिरिक्त उर्वरित युवकांवरही गुन्हे दाखल करा, असा आदेश जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी उपवन संरक्षणाधिकाऱ्यांना दिले आहेत.









