व्यावसायिकांना विक्री : अन्न खात्याने पावले उचलण्याची गरज : दंडात्मक कारवाईचा इशारा
बेळगाव : बेळगाव शहरासह जिल्ह्याच्या बहुतांश भागात गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा (एलपीजी) दुरुपयोग होत असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अन्न-नागरी पुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी दोन वर्षात 162 प्रकरणे दाखल केली असून, अद्याप गृहोपयोगी सिलिंडरचा दुरुपयोग करण्याला पायबंद बसलेला नाही. व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सध्या 1670 रुपये तर गृहोपयोगी गॅस सिलिंडरची किंमत 853 रुपये आहे. व्यावसायिक सिलिंडरची किंमत गृहोपयोगी सिलिंडरच्या दुप्पट असल्याचे दिसून येते. रस्त्याच्या बाजूची चहा टपरी, काही लहान हॉटेल, ढाबे, फास्ट फूड बनविणारे स्टॉल, रेस्टॉरंट, बेकरी आदी स्थळांवर गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा वापर होताना दिसतो. अन्न-नागरी पुरवठा खात्याने वेळीच कारवाई करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे मत आहे.
कागवाडमध्ये अधिक वापर
जिल्ह्यात 2023-24 मध्ये गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा दुरुपयोग झाल्याची 104 प्रकरणे दाखल झाली होती. तसेच 2024-25 मध्ये आतापर्यंत 58 प्रकरणे दाखल झाली आहेत. बेळगाव शहर, बैलहोंगल, खानापूर, कागवाड, अथणी यांसह अन्य तालुक्यातही गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा गैरवापर होत असल्याचे दिसून येत आहे. सर्वाधिक प्रकरणे कागवाड तालुक्यात दिसून येतात. या तालुक्यात 22 प्रकरणे दाखल झाली आहेत. काही ठिकाणी सरकारी कार्यालयाच्या परिसरात खाद्य पदार्थ बनविणाऱ्या स्टॉलवर गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा वापर होतो आहे.
बेकायदेशीरपणे विक्री
घरोघरी सिलिंडर वितरण करताना त्यामध्ये निर्दिष्टीत प्रमाणात गॅस नसल्याच्या तक्राऱ्या वाढल्या आहेत. सिलिंडरमधील थोड्या प्रमाणात गॅस वापरुन नंतर त्याचे ग्राहकांना वितरण करण्यात येत असल्याचे काही ठिकाणी दिसून आले आहे. तसेच कमी प्रमाणात गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा वापर करणाऱ्या ग्राहकांच्या नावे बेकायदेशीरपणे सिलिंडर विक्री करण्यात येत असल्याचे दिसून येत आहे. काही ग्राहक आपल्या नावावरील गॅस सिलिंडर काळा बाजारात विक्री करत असल्याचेही दिसून येते.
परवाना रद्द
गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा वापर हॉटेल किंवा अन्य कोणत्याही व्यावसायिक स्थळावर वापरण्यास परवानगी नाही. एखादेवेळी अशी प्रकरणे आढळून आल्यास गॅस वितरण करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. तसेच गृहोपयोगी सिलिंडरमध्ये गॅस कमी असल्याचे समजून आल्यास ग्राहकांनी वितरकांकडे तक्रार करावी, गॅस सिलिंडरचा काळा बाजारमध्ये विक्री करू नये, काळा बाजारात सिलिंडर विक्री करण्याचे दिसून आल्यास संबंधित ग्राहकांचा परवाना रद्द करण्यात येईल, असे अन्न-नागरी पुरवठा खात्याचे अधिकारी सांगत असले तरी अधिकाऱ्यांनी बेकायदेशीर कृती करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाईसाठी त्वरित पाऊल उचलावीत, अशी नागरिकांची मागणी आहे.
बेकायदेशीरपणे वापर
2024-25 मध्ये जिल्ह्यात विविध तालुक्यात गृहोपयोगी गॅस सिलिंडरचा दुरुपयोग होत असताना दाखल झालेली प्रकरणे याप्रमाणे- कागवाड 22, अथणी 13, बेळगाव शहर 10, बेळगाव ग्रामीण 5, खानापूर 4, रामदुर्ग 1 व अन्य 3.









