कराड :
कराड शहरात एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा गैरवापर करत महिला डॉक्टरसह दोन डॉक्टर आणि एका युवक-युवतीचे बनावट अश्लील व्हिडीओ तयार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हे व्हिडीओ परराज्यातून तयार करण्यात आल्याचा संशय असून याप्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 20 मे रोजी हा प्रकार घडला. एका युवतीला अनोळखी क्रमांकावरून अचानक एका व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये सामील करण्यात आले. या ग्रुपमध्ये एकूण 27 सदस्य होते. त्याच रात्री या ग्रुपवर एका महिला डॉक्टर व तिच्याशी कोणताही संबंध नसलेल्या दुसऱ्या डॉक्टरचे फोटो वापरून अश्लील व्हिडीओ पोस्ट करण्यात आला. काही वेळातच तक्रारदार युवतीचाही एक बनावट अश्लील व्हिडीओ शेअर करण्यात आला, ज्यामध्ये तिला एका युवकासोबत दाखवण्यात आले होते.
व्हिडीओत एआयच्या मदतीने तयार केलेले मजकूर, आवाज आणि दृश्य खऱ्याप्रमाणे भासवले गेले होते. ही बाब लक्षात येताच संबधित युवतीने त्वरित अन्य पिडीतांशी संपर्क साधत सर्व माहिती एकत्रित करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
तपासादरम्यान, या संपूर्ण प्रकारामागे स्वत:ला डॉक्टर म्हणून ओळखणारा एक संशयित असल्याचे समोर आले आहे. त्याने हे व्हिडीओ परराज्यात तयार करून घेतल्याचे आणि त्यासाठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याचे प्राथमीक चौकशीत स्पष्ट झाले आहे. या प्रकरणातील संशयितांकडून काही डिजीटल साहित्य जप्त करण्यात आले असून, त्यासंदर्भात कसून चौकशी सुरू आहे. दरम्यान, संपूर्ण प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता पोलिसांकडून तपास अत्यंत गुप्ततेत सुरू असून, सायबर तज्ञांच्या मदतीने तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत आहेत.








