कार्यक्रमापूर्वी चार दिवस आधी अर्ज करण्याची सूचना : काही अटी ठरताहेत जाचक
बेळगाव : विवाह सोहळा, नामकरण अथवा कोणत्याही प्रकारच्या खासगी कार्यक्रमाकरिता निवडणूक विभागाकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. त्यामुळे कार्यक्रम ठरवलेल्या नागरिकांनी निवडणूक कार्यालयात अर्ज देण्याचा प्रयत्न केला असता, कार्यक्रमापूर्वी चार दिवस आधी अर्ज करण्याची सूचना करण्यात येत आहे. त्यामुळे याबाबत गैरसमज निर्माण झाला असून, विवाहासाठी परवानगीची गरज नसल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र कोणत्याही कार्यक्रमासाठी परवानगी घेणे निवडणूक विभागाने बंधनकारक केले आहे. केवळ चार दिवस आधी अर्ज करण्याची सूचना करण्यात आली असता काहींचा गैरसमज निर्माण झाला आहे. 15 ते 20 दिवसांनंतर कार्यक्रम असला तरी परवानगीसाठी अर्ज केले जात आहेत. पण सध्या प्रचार आणि सभा, वाहन परवानगीकरिता निवडणूक कार्यालयात अर्जांची संख्या वाढली आहे. त्यामुळे खासगी कार्यक्रमांच्या परवानगीचे अर्ज प्रलंबित राहण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सोयीसह परवानगी देण्याच्यादृष्टीने सोयीस्कर व्हावे, याकरिता कार्यक्रमाच्या चार दिवस आधी कार्यालयात अर्ज देण्याची सूचना करण्यात येत आहे. प्रत्येक कार्यक्रमासाठी परवानगी घेण्यासाठी नागरिक निवडणूक कार्यालयात अर्ज करीत आहेत. पण अधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेचा गैरसमज होत आहे. त्यामुळे परवानगी न घेता कार्यक्रम आयोजित केल्यास कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी परवानगी घेणे आवश्यक आहे. विवाह समारंभाच्या परवानगीसाठी अर्ज करताना लग्नपत्रिका, अर्ज आणि कल्याणमंडपाचे बुकिंग केलेली पावती जोडणे आवश्यक आहे. त्यानुसार कागदपत्रांची जोडणी करून अर्ज करीत आहेत. पण लग्नपत्रिका प्रिंट करणाऱ्या प्रिंटिंग प्रेसचे नाव लग्नपत्रिकेवर असणे गरजेचे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर प्रिंटिंग प्रेसचे नाव नसलेली लग्नपत्रिका जोडून काही नागरिकांनी अर्ज केले होते. पण सदर विवाह सोहळ्यास उत्तर विभागाच्या रिटर्निंग अधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
नवनव्या अटींमुळे नागरिक अडचणीत…
विवाह सोहळ्याची तयारी करताना सर्वसामान्य नागरिकांच्या नाकीनऊ होते. अशातच निवडणूक विभागाने विविध अटी लादल्या असल्याने नागरिकांच्या समस्येत आणखी भर पडली आहे. अशातून संबंधित कागदपत्रांसह परवानगीसाठी अर्ज केला असता निवडणूक विभागाकडून नवनव्या अटी सांगण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांची अडचण झाली आहे. लग्नपत्रिका छापून वितरणदेखील केल्या आहेत. परवानगीच्या मागणीसाठी अर्ज केला असता आता प्रिंटिंग प्रेसच्या नावाची सक्ती करण्यात येत आहे. त्यामुळे निवडणूक विभागाने घातलेल्या अटी सर्वसामान्य नागरिकांना जाचक ठरत असल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.









