मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे स्पष्टीकरण
पणजी : शाळा, मंदिरांजवळ 100 मीटर परिघात मद्यालयांना परवानगी देण्याच्या निर्णयाला राज्यभरातून जोरदार विरोध आणि आक्रमक टीका झाल्यानंतर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याप्रकरणी लोकांचा मोठा गैरसमज झाल्याचे सांगितले. याप्रश्नी भूमिका मांडताना मुख्यमंत्र्यांनी राज्यात शाळा, मंदिरांजवळ मद्यालयांना परवाने देण्याचा कायदा 1980 पासून अस्तित्वात आहे. त्यानुसार मागील कित्येक सरकारनी अनेकांना परवाने दिलेलेही आहेत. माझ्या सरकारने आता परवाना शुल्क दुप्पट करण्याचा घेतलेला निर्णय हा नवीन मद्यालयांना परवाने देण्यासाठी नव्हे तर विद्यमान मद्यालयांसमोर अडचण निर्माण करण्याच्या उद्देशाने घेण्यात आला होता, असे सांगितले.
प्रत्यक्षात राज्यात गोवा अबकारी कायदा 1964 नुसार शाळा, मंदिरांपासून 100 मीटर परिसरात मद्यालयास परवाना देण्यात येत नाही. परंतु राज्यात पर्यटकांची संख्या वाढून पर्यटनास चालना मिळावी या उद्देशाने गत काही वर्षांत अनेक ठिकाणी शाळा आणि धार्मिक स्थळांपासून 100 मीटरच्या आत काही मद्यालयांना ‘विशेष’ परवाने देण्यात आले आहेत. त्याशिवाय खास करून समुद्र किनाऱ्यांजवळही मद्यालयांना परवाने जारी केले आहेत. यापुढे सदर मद्यालयांना नूतनीकरणासाठी दुप्पट शुल्क भरावे लागणार आहे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.









