बियास नदीला महापूर, भूस्खलनामुळे 450 हून अधिक ठिकाणी रस्ते बंद: उत्तराखंडमध्येही रेड अलर्ट जारी
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, शिमला
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासांपासून पाऊस पडत असल्यामुळे बियास नदीला महापूर आला आहे. अनेक ठिकाणी भूस्खलन झाले असून 450 हून अधिक ठिकाणी रस्ते बंद झाले आहेत. पाऊस सुरूच असल्यामुळे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर उत्तराखंडमध्येही मुसळधार पाऊस कोसळत असल्याने रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील तीन दिवस डेहराडूनसह 6 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्मयता हवामान खात्याने वर्तवली आहे. ऊद्रप्रयाग जिह्यातील गौरीकुंडमध्ये घडलेल्या भूस्खलनाच्या दुर्घटनेनंतर अजूनही शोधमोहीम सुरू आहे.
हिमाचल प्रदेशात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे बरीच पडझड झाल्याचे चित्र दिसत आहे. राज्यात सर्वाधिक नुकसान मंडी जिल्ह्यात झाले आहे. हिमाचलमध्ये गेल्या 24 तासांत झालेल्या पावसामुळे 452 रस्ते वाहनांच्या वाहतुकीसाठी ठप्प झाले आहेत. दोन राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही विस्कळीत झाली आहे. तसेच अनेक गावांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला असून 1814 वीज ट्रान्सफॉर्मर आणि 59 पाणीपुरवठा योजना ठप्प आहेत. मंडी जिह्यात सर्वाधिक 236 आणि शिमल्यात 59 रस्ते बंद आहेत. हिमाचल आपत्ती व्यवस्थापनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, 24 जून ते 12 ऑगस्ट या कालावधीत पावसाळ्यात 255 लोकांचा मृत्यू झाला असून 290 जण जखमी झाले आहेत. पावसामुळे आतापर्यंत 935 घरांची पडझड झाली आहे.
हवामान खात्याचा इशारा
पंजाब आणि हरियाणाच्या काही भागात हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो. त्याचवेळी, उत्तर प्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणातील 14 शहरांमध्ये हवामान खात्याने पावसाबाबत अलर्ट जारी केला आहे. पंचकुला आणि यमुनानगर जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, या महिन्यात आतापर्यंत मान्सून कमकुवत राहिला आहे. राज्यातील 20 जिल्हे असे होते की जेथे सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली आहे. पंजाबमध्ये पावसाअभावी तापमानात वाढ झाली आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, पंजाबचे तापमान आदल्या दिवसाच्या तुलनेत 0.5 अंशांनी अधिक आणि सामान्यपेक्षा 1.8 अंशांनी अधिक आहे. त्याचवेळी आज हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असला तरी पावसाची शक्मयता फारच कमी दिसत आहे.
राजस्थानमध्ये गेल्या आठवडाभरात मान्सूनचा वेग कमी झाल्याने खरीप पिकांचे नुकसान होण्याची शक्मयता बळावली आहे. पश्चिम राजस्थानमध्ये पुढील 7 ते 10 दिवस कमकुवत मान्सूनची स्थिती लक्षात घेता हवामान खात्याने शेतकऱ्यांना सिंचनाची व्यवस्था करण्याची सूचना केली आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, सिक्कीम, आसाम, मेघालय आणि अऊणाचल प्रदेश आदी राज्यांमध्ये मुसळधार तर, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये मध्यम पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.









