माकपच्या नेत्याविरोधात गुन्हा
वृत्तसंस्था/ कोट्टायम
केरळमधील एका शासकीय आरोग्य केंद्रात जेवणासाठी बाहेर पडलेल्या एका महिला डॉक्टरसोबत गैरवर्तन करण्यात आले आहे. याप्रकरणी एका इसमाच्या विरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. ही घटना 21 ऑक्टोबर रोजी वेल्लोर येथे घडल्याचे पोलिसांकडून सोमवारी सांगण्यात आले.
आरोपीने उपचारकक्षातून बाहेर पडणाऱ्या महिला डॉक्टरला रोखले आणि तिच्यासोबत गैरवर्तन केले, यामुळे महिला डॉक्टर बेशुद्ध पडल्याचे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. आरोपी शाहिम विरोधात डॉक्टर श्रीजा राज यांच्या तक्रारीच्या आधारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
डॉक्टर सकाळपासून शेकडो रुग्णांची पाहणी करत होत्या. दुपारच्या वेळी डॉक्टर श्रीजा जेवण करण्यासाठी बाहेर पडत असताना आरोपीने त्यांच्यासोबत गैरवर्तन केले आहे. आरोपी शाहिम हा माकपचा स्थानिक नेता आहे. याचदरम्यान केरळ गव्हर्नमेंटल मेडिकल ऑफिसर्स असोसिएशनने राज्य सरकारला रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता दूर करण्याचे आणि डॉक्टरांची संख्या वाढविण्याचे आवाहन केले आहे. रुग्णालयांमध्ये मर्यादित मनुष्यबळामुळे डॉक्टरांवरील ताण वाढत असल्याचे संघटनेने म्हटले आहे.









