34 वर्षे जुन्या घटनेवर आधारित चित्रपट
अक्षय कुमारचा ‘ओएमजी 2’ हा चित्रपट यशस्वी ठरला असून याचदरम्यान त्याने स्वत:च्या नव्या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. अक्षयचा ‘मिशन रानीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे.
मिशन रानीगंज हा एक सवाईवल थ्रिलर असून यात अक्षयसोबत परिणीति चोप्रा मुख्य भूमिकेत दिसून येणरा आहे. हा चित्रपट मायनिंग इंजिनियर जसवंत सिंह गिल यांच्या जीवनावर आधारित आहे. चित्रपटात अक्षय कुमार हा त्यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे.

मिशन रानीगंज या चित्रपटाकरता पूर्वी ‘द ग्रेट इंडियन रेस्क्यू’ हे नाव निश्चित करण्यात आले होते. तर त्यापूर्वी ‘कॅप्सूल गिल’ हे नाव ठरविण्यात आले होते. निर्मात्यांनी या चित्रपटाची पोस्टर्स शेअर केली असून यात जसवंत सिंह गिल यांच्या गेटअपमध्ये अक्षय अत्यंत प्रभावी दिसून येत आहे.
1989 मध्ये पश्चिम बंगालच्या रानीगंज कोळसा खाणीत अडकून पडलेल्या 65 मजुरांना बाहेर काढण्यास जसवंत सिंह गिल यांनी मोठी भूमिका बजावली होती. तेव्हा जसवंत सिंह हे रानीगंजमध्ये इंजिनियर म्हणून कार्यरत होते. रानीगंजची कोळसा खाण 104 फूट खोल होती आणि त्यात रात्री अचानक पाणी गळती सुरू झाली होती. खाणीत अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी विशेष प्रकारची कॅप्सूल तयार करण्यात आली होती. या कॅप्सूलमुळेच जसवंत सिंह गिल यांना कॅप्सूल गिल देखील म्हटले जात होते.









