केवळ सत्ता मिळवणे एवढय़ा एकाच ध्येयाने 1999 साली स्थापन झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाणवठय़ावर कितीक आले, कितीक गेले. जोपर्यंत पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर करडी नजर आणि पकड आहे, तोपर्यंत या पक्षाला धोका नाही. सत्ताकारणाचे आणि संपत्तीसंचयाचे लक्ष्य असल्याने त्यातच रस असलेल्या सगळय़ा नेतेमंडळींनी हा पक्ष सत्ता असेपर्यंत तरी बळकट ठेवण्याचा प्रयत्न केला. तथापि, आता परिस्थिती बदलली आहे. अन्य पक्षांमधून आयात केलेल्या बहुतेक नेत्यांनी ‘राष्ट्रवादी’ला वेळोवेळी तिलांजली दिली आणि पुन्हा जवळीकही साधली. फक्त छगन भुजबळ शिवसेनेतून आल्यानंतर पक्षात टिकून आहेत. त्याला अनेक कारणे आहेत. त्यातील एक म्हणजे काही वर्षे तुरुंगवासही ते भोगून जामिनावर सुटले आहेत. वेगवेगळी मंत्रीपदे उपभोगल्यानंतर पक्ष सोडणाऱयांमध्ये लक्ष्मण ढोबळे, दिलीप सोपल, गणेश नाईक, बबनराव पाचपुते, पद्मसिंह पाटलांचे पुत्र राणा जगजितसिंह अशी अनेक नावे सांगता येतील. रामदास आठवले यांनीही सत्तेसाठी आपला पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसच्या दावणीला बांधला होता. अर्थात ‘जिकडे खोबरे, तिकडे चांगभले’ हे आठवले यांचे धोरणच आहे. मूळात सगळे करारच सत्तेसाठी असल्याने ही धरसोड पवार यांनी गृहित धरली होती. भारतीय जनता पक्षाच्या पूर्वीच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शरद पवार यांचे महत्त्व जाणले होते, त्यामुळे त्यांना चुचकारत जेवढी सत्तास्थाने काबीज करता येतील तेवढी मिळवण्याचे त्यांचे धोरण होते. आता नरेंद्र मोदी आणि विशेषतः अमित शहा यांनी पक्षसूत्रे हाती घेतल्यानंतर ‘शत-प्रतिशत कमळा’चा अजेंडा राबवला आहे. त्यासाठी प्रादेशिक पक्ष खिळखिळे करून संपवून टाकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत. तेलंगणातील तेलुगु देसम पक्ष अशाच पद्धतीने नेस्तनाबूत झाला आहे. अशी आणखीही उदाहरणे सांगता येतील. महाराष्ट्र, त्यातही मुंबई आपल्या मुठीत ठेवण्याची त्यांची धडपड होती. मुंबई महानगरपालिका वर्षानुवर्षे शिवसेनेच्या ताब्यात आहे, हे भाजपला खुपते आहे. मागच्या अडीच वर्षांतील महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि शिवसेनेचे पतन पाहिल्यानंतर आतून दुभंगलेला हा पक्ष आता उभारी धरू शकणार नाही, अशी भाजपची खात्री आहे. या स्थितीत शिवसेनेनंतर, राष्ट्रवादी काँग्रेसच आपला प्रधान शत्रू आहे असे मानून त्याला गारद करण्याचे त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांचा प्रभाव कमी करण्यासाठी त्यांच्या कुटुंबात कलह माजवून धनंजय मुंडे यांना आपल्या पंखांखाली घेतले. शिवाय त्यांना करुणा शर्मा प्रकरणाची मेख मारून सर्वस्वी आपल्या अंकित ठेवले. पवारांनी दाखवून दिलेल्या याच मार्गाचा अवलंब करीत भाजपने अजित पवार आणि त्यांच्या पुत्राला आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या शपथविधीमुळे हे सिद्ध झाले. देवेंद्र फडणवीस यांनी या सगळय़ा राजकीय घडामोडी मोठय़ा चतुराईने आखल्या आणि प्रत्यक्षात घडवल्या. देवेंद्र ज्या पद्धतीने राजकीय डावपेच रंगवत आहेत, ते ‘स्कूल’ शरद पवार यांचे आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हे देवेंद्रांचे मूळ असले तरी आयाळ कापून डोलण्याचा देवेंद्रांचा स्वभाव नाही. मुख्यमंत्रीपदासाठी उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या आपल्या पारंपरिक विरोधकांशी घरोबा केल्यानंतर देवेंद्र स्वस्थ बसणे शक्मय नव्हते. 2019 मध्ये मुख्यमंत्रीपद भलेही उद्धव यांनी खेचून घेतले असेल, पण देवेंद्र आता शिवसेनाच उद्धव यांच्या ताब्यातून काढून घेत आहेत. शिवसेनेतील अस्वस्थता हेरून त्यांनी एकनाथ शिंदे गट फोडला आणि त्यानंतरची ‘भवती न भवती’ अद्याप सुरूच आहे. याची पुनरावृत्ती राष्ट्रवादी काँग्रेसबाबत होत आहे. एकीकडे घराणेशाहीला विरोध करायचा आणि दुसरीकडे आपल्याच मुला-बाळांना पक्षाच्या नेतेपदी नेमायचे हे बाळासाहेब ठाकरे यांनी जसे केले तसेच पवार यांनीही केले. पवारांनंतर सुप्रिया सुळे या पक्षातील सत्ताकेंद्र आहेत. डोईजड होऊ शकणाऱया प्रत्येकाचे पंख कसे कापायचे आणि त्यांना आपल्याच पिंजऱयात कसे बद्ध करायचे हे छगन भुजबळ यांच्या रुपाने त्यांनी दाखवले. आता प्रफुल्ल पटेल यांची वेळ आहे. पवार यांची ही नीती दिवंगत पी. ए. संगमा यांनी वेळीच ओळखली होती आणि ते या पक्षापासून बाजूला झाले. आता येनकेनप्रकारे राष्ट्रवादी काँग्रेस संपवण्याची कूटनीती आखताना पवार यांचे डावपेच त्यांच्यावरच उलटवण्याचा खेळ भाजप करीत आहे. ज्या साखर कारखाना आणि सहकार चळवळीच्या जोरावर पवार यांनी आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते, त्याचाच धाक दाखवत त्यांचे सगळे शिलेदार भाजपच्या वाटेवर येत आहेत. सोलापूर जिह्यातील मोहोळचे माजी आमदार राजन पाटील, माढय़ाचे आमदार बबनराव शिंदे यांच्या साखर कारखान्यांमधील भानगडी चव्हाटय़ावर येऊन त्यांची विश्वासार्हता संपण्याची चिन्हे दिसायला लागली आहेत. तेव्हा त्यांनी पवार यांच्या परवानगीनेच दिल्ली गाठली आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणत्याही परिस्थितीत कारवाई टाळणे हा त्यांचा हेतू आहे. येत्या काळात राज्यात पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत. त्यामध्ये जास्तीत जास्त ठिकाणी भाजपची सत्ता आणण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीस करीत आहेत. केंद्रीय यंत्रणांचा धाक दाखवून तालुकास्तरावरील नेत्यांना भाजपमध्ये आणले जाईल आणि ग्रामपंचायतीपासून विधीमंडळापर्यंत सगळीकडे ‘कमळ’ फुलवले जाईल. ‘मिशन लोटस’ कदाचित पूर्ण होईल न होईल, मात्र कोणता नेता कोणत्या पक्षाचा आहे, याचा संभ्रम मात्र जनतेच्या मनात दीर्घकाळ राहील. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राजकारण हे शंभर टक्के सत्ताकारण झाल्याचे म्हटले आहे, त्याचा पुरावा त्यांचाच पक्ष देत आहे. ‘वदतो व्याघात’ तो हाच !
Previous Articleटी-20 संघ त्रिनिदादमध्ये दाखल
Next Article शिवसेनेचे नाव, चिन्ह गोठवण्याचा भाजपचा हेतू
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








