अधिकाऱ्यांना विचारला जाब, पाणी समस्या सोडविण्याची मागणी
पेडणे : पेडणे मतदारसंघात गेले अनेक दिवस पाण्याची तीव्र टंचाई भासत असून दिवसेंदिवस ही समस्या गंभीर रूप धारण करत आहे. या समस्येवर तोडगा काढावा अशी मागणी करण्यासाठी आणि त्यांना पाणी विभाग अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी सोमवार दि. 3 रोजी पाणी विभाग कार्यालयावर मिशन फॉर लोकलचे प्रमुख राजन कोरगावकर यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढून संबंधित पाणी विभागाचे अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. यावेळी मधुकर पालयेकर, गजेंद्र गडेकर, गजानन सावळ देसाई, सुधीर कुबडे, सुनील नाईक, गुंडू राऊळ, राकेश स्वर, गिरीश कामत, राजन पेडणेकर, श्रीधर शेणवी देसाई, प्रदीप पटेकर आदी उपस्थित होते.
एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता
यावेळी पाणी विभागाचे अभियंते सोमा नाईक, कनिष्ठ अभियंते संदीप मोरजकर, साहाय्यक गौरेश ठाकूर यांना राजन कोरगावकर यांनी पेडणे मतदार संघात पाण्याच्या तीव्र टंचाई बाबत विविध प्रश्न उपस्थित केले. यावर तुम्ही काय तोडगा काढला. दरवर्षी पेडणे मतदारसंघात व संपूर्ण पेडणे तालुक्यात पाणी समस्या गंभीर होत असून एप्रिल व मे महिन्यात पाण्याची कमतरता भासत आहे. या समस्येवर पूर्व नियोजन म्हणून आपल्यातर्फे कोणत्या उपाययोजना राबविण्यात आल्या असा सवाल उपस्थित केला.
कोरगावमध्ये पाण्याची तीव्र टंचाई
कोरगाव भागात पाण्याची तीव्र टंचाई असून त्यासाठी पाणी सोडण्यासाठी नियोजित वेळापत्रक तयार करावे. गेली अनेक वर्षे चांदेल पाणी प्रकल्प पिण्याची तहान भागवत आहे, मात्र हा पाणी प्रकल्प पेडणे तालुक्याच्या वाढत्या लोकसंख्येमध्ये आणि मोठ्या प्रमाणात घेतलेल्या नळ जोडण्यांसाठी अपुरा पडत आहे. एप्रिल मे महिन्यामध्ये ही पाणी टंचाई प्राधान्य क्रमाने दरवर्षी होते. यासाठी आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित केला होता, असे कोरगावकर यांनी सांगितले.
दारूच्या भट्ट्यांसाठी नियमित पाणी
नईबाग पेडणे या भागात पाणीटंचाई का होते. दारूच्या भट्ट्यांसाठी मात्र नियमित पाणी असते. पण आमच्या एका भागात पाणी येत नाही. यासंबंधी आपण संबंधित खात्याकडे अनेक वेळा तक्रारी केल्या. मात्र खात्यातर्फे योग्य तो तोडगा काढण्यात अजून पर्यंत आलेला नाही. याबाबत पाणी विभाग अधिकाऱ्यांनी यात विशेष लक्ष घालून आमची पाणी समस्या सोडवावी अशी मागणी यावेळी राकेश स्वार यांनी केली.
वारखंडमध्ये नागरिकांचे हाल
धारगळ पंचायत क्षेत्रामध्ये पाण्याचे विविध स्रोत आहेत, मात्र याबाबत नियोजित योजना आखल्यास पाणीपुरवठा सुरळीत होईल, असे गिरीश कामत यांनी सांगितले. वारखंड भागात पाण्याची मोठ्या प्रमाणात समस्या असून पाणी नियमित वेळेत येत नाही. ते कधी सकाळी तर कधी दुपारी तर कधी संध्याकाळी असे अनियमित वेळेत येते. त्यामुळे नागरिकांचे पाण्यासाठी खूप हाल होत असून यासाठी योग्य नियोजन करण्याची गरज आहे, गजेंद्र गडेकर म्हणाले.
चांदेल प्रकल्प सुरु होताच समस्या सुटणार : सोमा नाईक
सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री या विषयाकडे लक्ष देण्यासाठी ते पेडणे तालुक्याला भेट देणार आहेत. पेडणे तालुक्यामध्ये पाण्याचे विविध ठिकाणी जलकुंभ आहेत. मात्र त्यांना अपुऱ्या पाण्यामुळे पुरवठा करता येत नाही. एक वर्षानंतर चांदेल येथील 15 एमएलडी प्लांट पूर्णत्वास आल्यानंतर ही समस्या सुटणार असल्याचे पाणी विभागाचे अभियंते सोमा नाईक यांनी सांगितले.
खंडित वीज पुरवठ्यामुळे अडचणी
वीज पुरवठा खंडित झाल्यानंतर दोन-तीन दिवस ही पाण्याची मोठी समस्या होते. चांदेल पाणी प्रकल्पावर पाणी शुद्धीकरण केल्यानंतर सोडण्यात येते. मात्र खंडित वीज पुरवठ्यामुळे पाण्याचा मोठा घोळ होत आहे. ही समस्या लोकांनी समजून घ्यावी. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी आपण खास जनरेटर देण्याची मागणी केलेली आहे, असे यावेळी अभियंते सोमा नाईक सांगितले.









