3 सदस्यांसह समुद्रात 6 किलोमीटर खोलवर पोहोचणार ‘मत्स्य 6000’
अमेरिका, चीन यासारख्या विकसित देशांप्रमाणेच आता भारतदेखील भूगर्भातील रहस्यांची उकल करण्यासाठी स्वत:ला पूर्णपणे तयार करत आहे. अंतराळात इतिहास रचल्यावर भारत आता खोल समुद्रात असलेल्या खनिजांचा शोध घेण्यासाठी पहिले सागरी मिशन सुरू करणार आहे. भारत लवकरच स्वत:चे पहिले महासागर मिशन ‘समुद्रयान’ अंतर्गत मानवयुक्त पाणबुडी खोल समुद्रात पाठविणार आहे. ही पाणबुडी 3 व्यक्तींना समुद्रात 6 हजार मीटर खोलवर नेणार आहे. या पाणबुडीचे नाव ‘मत्स्य 6000’ ठेवण्यात आले आहे. या पाणबुडीचे पहिल्या टप्प्याचे परीक्षण मार्च 2024 पर्यंत पूर्ण होणार आहे. याचाच अर्थ 2026 पर्यंत ‘मत्स्य 6000’ तीन भारतीयांना महासागरात 6 हजार मीटर खोलवर नेत संशोधन करणार आहे.
समुद्रयान मिशनचा उद्देश
या मोहिमेची सुरुवात केंद्र सरकारच्या ब्ल्यू इकॉनॉमी पुढाकाराच्या अंतर्गत करण्यात आली होती. ही भारताची अशी पहिली सागरी मोहीम आहे, ज्यात खोल समुद्रात मानव पोहोचणार आहे. या मोहिमेचा उद्देश खोल समुद्रातील साधनसामग्री आणि जैववैविध्यावर संशोधन करणे आहे. या मोहिमेत सबमर्सिबलचा वापर केवळ एक्सप्लोरेशनसाठी केला जाणार आहे. जेणेकरून तेथील पर्यावरणाला किमान हानी पोहोचविण्याचे उद्दिष्ट गाठता येईल. सध्या या मोहिमेवर चेन्नईतील राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था (एनआयओटी) काम करत आहे. समुद्रयान मोहिमेच्या अंतर्गत 3 जणांना समुद्रात 6 हजार मीटर खोलवर पाठविले जाणार आहे. या तिन्ही जणांना तिथपर्यंत पाठविण्यासाठी जे वाहन तयार केले जात आहे, त्याला ‘मत्स्य 6000’ नाव देण्यात आले आहे.
काय आहे ब्ल्यू इकॉनॉमी
जागतिक बँकेनुसार आर्थिक विकास, उत्तम उपजीविका आणि नोकऱ्यांसाठी सागरी पर्यावरणाचे रक्षण करत महासागरातील साधनसंपदेचा निरंतर वापर हीच ब्ल्यू इकॉनॉमी आहे. भारतात ब्ल्यू इकॉनॉमी अंतर्गत सागरी परिवहन, पर्यटन, मत्स्यपालन आणि किनारी गॅस अन् वायू इत्यादींचा शोध सामील आहे. ब्ल्यू इकॉनॉमीमुळे एक्वाकल्चर आणि सागरी जैवतंत्रज्ञानाला अत्यंत अधिक सहकार्य मिळते. यामुळे खाद्यसमस्येवर तोडगा काढण्यास देखील मदत मिळणार आहे. समुद्राच्या तळाशी लपलेल्या ब्ल्यू वेल्थबद्दल जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सातत्याने डीप ओशन मिशन म्हणजेच खोल समुद्र अभियानाच्या महत्त्वाचा उल्लेख केला आहे.
ब्ल्यू इकॉनॉमीचे भारतासाठी महत्त्व
भारत असो किंवा अमेरिका कुठल्याही देशासाठी ब्ल्यू इकॉनॉमीचे अत्यंत अधिक महत्त्व आहे. भारतासाठी ब्ल्यू इकॉनॉमीचे महत्त्व या दृष्टिकोनामुळेही वाढते की भारताकडे एक अनोखी सागरी स्थिती आहे. भारताकडे 1,382 बेटांसमवेत 7,517 किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा आहे. हा समुद्रकिनारा 9 किनारी राज्यांमध्ये फैलावलेला आहे. येथील 12 प्रमुख आणि 200 छोटी बंदरे देशाच्या 95 टक्के व्यापारास सहाय्यभूत आहेत. ब्ल्यू इकॉनॉमीचा देशाच्या जीडीपीतील योगदान सुमारे 4 टक्के आहे. भारताचे विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) 2.2 दशलक्ष चौरस किलोमीटरपेक्षा अधिक फैलावलेला आहे. लाभलेला मोठा समुद्रकिनारा पाहता भारतासाठी महासागर आधारित पर्यटनाची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढते. जागतिक व्यापाराचा 80 टक्के व्यापार समुद्राच्या माध्यमातून होतो. जगातील 40 टक्के लोकसंख्या किनारी क्षेत्रांनजीक राहते. तसेच जगातील 3 अब्जाहून अधिक लोक स्वत:च्या उपजीविकेसाठी महासागरांवर अवलंबून आहेत.
कधी सुरू झाले समुद्रयान मिशन
29 ऑक्टोबर 2021 रोजी केंद्रीय राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते समुद्रयान मिशनचा शुभारंभ झाला होता. या मोहिमेच्या शुभारंभासोबत समुद्राच्या आतील घडामोडींना मूर्त रुप देण्यासाठी विशिष्ट तंत्रज्ञान असणाऱ्या निवडक देशांच्या यादीत भारत सामील झाला. अशाप्रकारचे तंत्रज्ञान यापूर्वी अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या देशांकडेच होते. समुद्रयान मिशन पूर्ण करण्यासाठी 6 हजार कोटी रुपयांचे बजेट निर्धारित करण्यात आले असून हे महासागर मिशनचाच एक हिस्सा आहे. ‘डीप ओशन मिशन’ म्हणजेच समुद्रयान मिशनवर पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या (एमओईएस) प्रस्तावाला आर्थिक विषयक मंत्रिमंडळ समितीकडून 16 जून 2021 रोजी मंजुरी देण्यात आली होती.
समुद्रयान मिशनची आवश्यकता
समुद्रयान मिशन पूर्ण झाल्याने भारताची वैज्ञानिक क्षमता वाढणार आहे. याचबरोबर जगातील अन्य देशांसमोर भारताच्या राष्ट्रीय प्रतिष्ठेला उंचाविणारी ही कामगिरी ठरणार आहे. तसेच भारत या मोहिमेत यशस्वी ठरल्यास भारत देखील खोल समुद्र आणि साधनसंपदेच्या शोधात विकसित देशांच्या श्रेणीत सामील होणार आहे. भारतापूर्वी अनेक विकसित देशांनी अशाप्रकारची मोहीम साकारली आहे. परंतु भारत या मोठ्या मोहिमेला मूर्त रुप देणारा पहिला विकसनशील देश ठरणार आहे.
खोल समुद्रात काय करणार पाणबुडी?
समुद्रयान मिशनचा उद्देश खोल समुद्रात दुर्लभ खनिजांचा शोध घेत त्यावर संशोधन करणे आहे. याच कारणामुळे पाणबुडी पाण्यातील अध्ययनासाठी तीन व्यक्तींना 6 हजार मीटर खोल समुद्रात नेणार आहे. सर्वसाधारणपणे पाणबुड्या समुद्रात केवळ 200 मीटर खोलवर पोहोचतात. परंतु ‘मत्स्य 6000’ची निर्मिती अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबत केली जात आहे. पृथ्वी विज्ञान मंत्रालयानुसार मत्स्य 6000 या मोहिमेसोबत आगामी काळात समुद्रात 1 हजार ते 5,500 मीटरदरम्यान खोलवर स्थित गॅस हायड्रेट्स, पॉलिमेटेलिक मॅगनीज नोड्यूल्स, हायड्रो-थर्मल सल्फाइड आणि कोबाल्ट क्रस्ट्स यासारख्या साधनसंपदेचा शोध घेण्यास सुविधा प्रदान करणार आहे.
पाणबुडी निर्मितीचे कार्य
मत्स्य 6000 चे डिझाईन जवळपास पूर्ण झाले असून याकरता निर्मितीकार्यही हाती घेण्यात आले आहे. मानवयुक्त पाणबुडी निकोल, कोबाल्ट, दुर्लभ खनिजांचा शोध अन् नमुन्यांच्या संग्रहाकरता खोल समुद्रात मानवाकडून प्रत्यक्ष अवलोकनची सुविधा प्रदान करणार आहे. याचा वापर विश्लेषणासाठी केला जाऊ शकतो असे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले आहे. केंद्र सरकारने 2021 मध्ये 5 वर्षांसाठी 4,077 कोटी रुपयांच्या एकूण बजेटवर या मोहिमेला मंजुरी दिली होती. परंतु 3 वर्षे म्हणजेच 2021-24 साठी पहिल्या टप्प्याचा अनुमानित खर्च 2,823 कोटी रुपये इतका आहे. सद्यकाळात अमेरिका, रशिया, फ्रान्स, जपान आणि चीन या चार देशांकडे खोल समुद्र मोहिमेसाठी विशेष तंत्रज्ञान आहे. भारत ही मोहीम पूर्ण करण्यास यशस्वी ठरल्यास भारत सागरी मोहिमेसाठी विशेष तंत्रज्ञान असणारा पाचवा देश ठरणार आहे.
पाणबुडीचा चालू वर्षी अपघात
टूर कंपनी ओशियनगेटची एक पाणबुडी जून महिन्यात मध्य अटलांटिक महासागरात जगातील सर्वात चर्चित जहाजांपैकी एक टायटॅनिकचे अवशेष पाहण्यासाठी रवाना झाली होती. या छोट्या पाणबुडीतून 5 जण प्रवास करत होते. प्रवासास प्रारंभ झाल्याच्या एक तास 45 मिनिटांनीच या पाणबुडीसोबतचा संपर्क तुटला होता. काही काळानंतर या पाणबुडीला दुर्घटनेला सामोरे जावे लागल्याचे स्पष्ट झाले होते. या दुर्घटनेत पाचही जणांना जीव गमवावा लागला होता. समुद्रात उतरलेल्या या पाणबुडीचे वजन 10,432 किलोग्रॅम इतके होते आणि ती 13,100 फुटांच्या खोलीपर्यंत पोहोचू शकत होती.
कशी झाली सुरुवात?
-वैज्ञानिकांनी 500 मीटर खोल समुद्रात जाणारे यान तयार केले.
-बंगालच्या उपसागरात निधी जहाजावरून झाले परीक्षण
-हे परीक्षण यशस्वी ठरल्यावर 2021 मध्ये मिळाला हिरवा कंदील
-राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था महासागर मिशनमध्ये सामील
– हजार कोटी रुपयांचा प्रकल्प, 4077 कोटीचा अनुमानित खर्च
मत्स्य 6000
– टायटेनियमद्वारे तयार होणार अत्याधुनिक पाणबुडी
– 60 टक्क्यांहून अधिक हिस्सा आहे स्वदेशी
– पाणबुडीचा एकूण व्यास 2.1 मीटर
– रडार, भूकंपसंबंधी उपकरणांचा अंतर्भाव
– समुद्रतळावरील भूकंपीय तरंगांची नोंद करणारे उपकरण
– 12 कॅमेऱ्यांद्वारे नोंद होणार मत्स्य 6000 चा पूर्ण प्रवास
– 96 तासांपर्यंत राहू शकतात 6 हजार मीटर खोल समुद्रात
– 2026 पर्यंत मोहीम पूर्ण होण्याची अपेक्षा
– मोहिमेमुळे मत्स्यपालन अन् जलीय कृषी होणार विकसित
– सागरी साधनसंपदेमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस
प्रमुख जागतिक मोहिमा
1960 – अमेरिकेच्या नौदलाचे लेफ्टनंट डॉन वॉल्श आणि स्वीत्झर्लंडचे इंजिनियर जॅक्स पिककार्ड 10 हजार मीटर खोल मारियाना ट्रेंचमध्ये पोहोचले.
1984 – जपानने 10 हजार मीटरपेक्षा अधिक खोल समुद्रात संशोधनसाठी मानवरहित यान पाठविले.
1996, 2006 – अमेरिकेने 10,916 मीटर खोल समुद्रात मानवरहित यानाने करविले संशोधन.
2019- अमेरिकन यानातून व्हिक्टर वेस्कोवो 10,998 मीटर खोलवर मारियान ट्रेंचमध्ये पोहोचले.
2019 – रशियाची मिर-1 पाणबुडी प्रशांत महासागराच्या मारियाना ट्रेंचमध्ये 10,994 मीटर खोलवर पोहोचली.
2020 – रशियन अकॅडमी ऑफ सायन्सने पुन्हा 10,016 मीटर खोल समुद्रात पोहोचण्याची कामगिरी केली.
2023 – दक्षिणपूर्व हिंदी महासागरात डायमेंटिना ट्रेंचमध्ये चीन 10,909 मीटर खोल समुद्रात पोहोचला.
उमाकांत कुलकर्णी









