टीम इंडियाचा कर्णधार रोहितचा निर्धार : सिराज, कुलदीपचे केले कौतुक
वृत्तसंस्था/ कोलंबो
आशियाई क्रिकेटमधील सर्वात मानाची क्रिकेट स्पर्धा असलेल्या आशिया चषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (17 सप्टेंबर) खेळला गेला. भारतीय गोलंदाजांनी भेदक गोलंदाजी करताना श्रीलंकेचा डाव केवळ 50 धावांवर संपवला होता. या धावांचा पाठलाग करताना भारताने एकही गडी न गमावता दहा गडी राखून विजय मिळवला. यासह भारताने आठव्यांदा आशिया चषक आपल्या नावे केला. आशिया चषकाची मोहित फत्ते केल्यानंतर आता लक्ष्य वर्ल्डकप असल्याची प्रतिक्रिया भारतीय कर्णधार रोहित शर्माने दिली.
या विजयानंतर प्रतिक्रिया देताना रोहित म्हणाला, ही खूप ग्रेट कामगिरी होती. अशा प्रकारचा विजय तुम्हाला निश्चितच आत्मविश्वास देतो. स्लीपमध्ये उभे राहून मला दिसत होते की, आमचे वेगवान गोलंदाज किती मेहनत घेत आहेत. मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या व बुमराहला याचे श्रेय द्यावे लागेल. संपूर्ण स्पर्धेमध्ये सर्वांनी आपले योगदान दिले. आम्ही या स्पर्धेत एक संघ म्हणून जे काही साध्य करण्यासाठी आलो होतो ते सर्व साध्य केले आहे. हार्दिक आणि इशान किशनने पाकिस्तान विरूद्ध सामन्यात दबावात फलंदाजी केली. त्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने शतकी खेळी केली. ज्या प्रकारे गिलने फलंदाजी केली. खेळाडूंनी वेगवेगळ्या परिस्थितीत आपली प्रतिभा दाखवून दिली, ही निश्चितच कौतुकास्पद कामगिरी आहे. आशिया चषकाची मोहीम फत्ते झाली आहे. आता, आता पुढचे लक्ष ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका आणि वनडे विश्वचषक असेल, असे तो यावेळी म्हणाला.
अक्षर, श्रेयसबाबत ‘वेट अँड वॉच’ची भूमिका
श्रेयस अय्यरबद्दल रोहित म्हणाला, श्रेयसच्या फिटनेसबाबत मला माहीत आहे. अंतिम सामन्यात तो खेळू शकला नाही. काही पॅरामीटर्समुळे तो बाहेर राहिला. पण आता तो 99 टक्के ठीक आहे. श्रेयसने नेटमध्ये मेहनत घेतली आहे. त्यामुळे तो सध्या बरा दिसत आहे. अक्षर पटेलच्या दुखापतीबाबतही रोहितने माहिती दिली. तो म्हणाला की, अक्षरला किरकोळ दुखापत झाली असे सध्याचे तरी चित्र आहे. आठवडाभरात किंवा दहा दिवसांत तो बरा होईल. आता तो दुखापतीतून कसा सावरतो हे पाहायचे आहे, कारण प्रत्येक खेळाडूची परिस्थिती वेगळी असते. काही खेळाडू लवकर बरे होतात. काही खेळाडूंना वेळ लागतो, यामुळे सध्या तरी दोघांच्या दुखापतीबद्दल थोडी वाट पाहण्याची गरज असल्याचे तो म्हणाला.
आशिया कप जिंकल्यानंतर भारतीय संघ आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात एकदिवसीय मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियन संघाने रविवारी आपला संघ जाहीर केला. दोन्ही संघांमध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्डकपपूर्वी भारताची ही शेवटची वनडे मालिका असेल. यामुळे घरच्या मैदानावर टीम इंडियासाठी ही प्रतिष्ठेची मालिका असणार आहे.
उभय संघातील वनडे सामन्याचे वेळापत्रक
- 22 सप्टेंबर – पहिली वनडे (मोहाली)
- 24 सप्टेंबर – दुसरी वनडे (इंदूर)
- 27 सप्टेंबर – तिसरी वनडे (राजकोट)









