ऑनलाईन टीम/तरुण भारत
नेपाळमधील पोखराहून जोमसोमकाडे जात असताना बेपत्ता झालेल्या विमानाचे अवशेष सापडले आहेत. नेपाळच्या लष्कराने दिलेल्या माहितीनुसार, हे विमान हिमालयातील मानापाथीच्या खालच्या भागात दिसले. तसेच हे विमान मुस्तांगच्या कोवांग गावात सापडले. १९ आसन असलेल्या या विमानात ४ भारतीय, ३ विदेशी आणि १३ नेपाळी प्रवासी होते. सर्व प्रवासी सुरक्षित असल्याचं सांगितलं जात आहे.
दरम्यान या विमानातून प्रवास करणाऱ्या ठाण्यातील अशोक कुमार त्रिपाठी (५४), त्यांची पत्नी वैभवी बांदेकर(५१), मुलगा धनुष त्रिपाठी(२२) आणि मुलगी रितिका त्रिपाठी(१५) हे चौघे अपघातात बेपत्ता आहेत.चौघांचा अद्याप शोध लागलेला नाही. अशोक त्रिपाठी आणि त्यांची पत्नी वैभवी बांदेकर हे दोघे गेल्या काही वर्षांपासून विभक्त राहतात. न्यायालयाच्या आदेशानुसार त्रिपाठी दाम्पत्य वर्षातून एकदा एकत्र येऊन दोन्ही मुलांना दहा दिवस बाहेर फिरायला घेऊन जातात. अशाचप्रकारे ते यंदा नेपाळमध्ये फिरायला गेले होते. मात्र मध्येच हा विमान अपघात झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, लष्कराच्या अधिकाऱ्यांना दूरवरुन धूर निघताना दिसला, त्यामुळे विमानाचा शोध घेण्यास मोठी मदत झाली. लष्कराचे प्रवक्ते नारायण सिलवाल यांनी सांगितले की, स्थानिक लोकांनी लष्कराला दिलेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या विमानाला भूस्खलनामुळे लामचे नदी परिसरात अपघात झाला. तारा एअरचे विमान लामचे नदीच्या किनाऱ्यावर हिमालयातील मानापथीच्या खालच्या बाजूस कोसळले होते. नेपाळ लष्कर जमीन आणि हवाई मार्गाने घटनास्थळी पोहोचत आहेत. खराब हवामानामुळे लष्काराला बचाव करण्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.