वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
‘लापता लेडीज’ हा चित्रपट 97 व्या ऑस्कर पुरस्कार-2025 च्या शर्यतीतून बाहेर पडला आहे. अंतिम 15 चित्रपटांच्या यादीत या चित्रपटाचा समावेश होऊ शकला नाही. अकादमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेसने बुधवारी सकाळी ही घोषणा केली. यावर चित्रपटाच्या टीमने प्रतिक्रिया देताना नाराजी व्यक्त केली आहे. ‘लापता लेडीज’ला शॉर्टलिस्टमध्ये स्थान न मिळणे आमच्यासाठी निराशाजनक आहे. पण, या प्रवासात चाहत्यांसह पुरस्कार मंडळाकडून आम्हाला मिळालेल्या पाठिंब्याबद्दल आणि विश्वासाबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आम्ही आमच्या चित्रपटाचा विचार केल्याबद्दल अकादमी सदस्य आणि एफएफआय (फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया) ज्युरी यांचे आभार मानतो. जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांसह या आदरणीय प्रक्रियेत सामील होणे हासुद्धा आमचा सन्मान आहे, असे स्पष्ट करण्यात आले. आम्ही शॉर्टलिस्ट केलेल्या 15 चित्रपटांच्या टीम्सचे अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो, असेही पुढे स्पष्ट करण्यात आले.









