वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आफ्रिकेतील केनिया देशात गेल्या तीन महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या दोन भारतीयांची अखेर हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे. केनियाच्या केंद्रीय प्रशासनाने हे प्रतिपादन केले. या दोघांची हत्या केनियातील बंदी घालण्यात आलेल्या स्पेशल फोर्स युनिट या संघटनेने केल्याचे स्पष्ट करण्यात आले.
बालाजी टेलेफिल्म्सचे सीओओ झुल्फिकार अहमद आणि त्यांचे मित्र महमद झैद सामी किडवाई अशी हत्या झालेल्यांची नावे आहेत. हे दोघेही केनियाचे अध्यक्ष विल्यम रोटो यांच्या सोशल मीडिया टीममध्ये होते. त्यांनी अध्यक्षांना राजकीय प्रचार करण्यामध्ये मोठे साहाय्य केले होते, अशी माहिती केनिया प्रशासनाने दिली. झुल्फिकार अहमद हा 48 वर्षांचा असून तो हूक या ओटीटी प्लॅटफॉर्मचा व्यवस्थापकीय संचालकही पूर्वी होता. त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाल्यानंतर मृत्यूविषयी अधिक माहिती मिळू शकेल, असेही सांगण्यात आले आहे.









