गणपती पाहण्यासाठी गेले असता बेपत्ता
बेळगाव : गणपती बघण्यासाठी म्हणून घराबाहेर पडलेली दोन अल्पवयीन मुले बेपत्ता झाली होती. उद्यमबाग पोलिसांनी एक होमगार्ड व आणखी एका बालकाच्या मदतीने बेपत्ता मुलांचा शोध घेतला आहे. अनमोल शंकर परियाळ (वय 10), कार्तिक अर्जुन परियाळ (वय 8) दोघेही राहणार शिवशक्तीनगर, अनगोळ अशी त्यांची नावे आहेत. बेपत्ता होऊन 24 तासात त्यांचा शोध घेण्यात यश आले. शुक्रवार दि. 5 रोजी दुपारी 12 वाजता हे दोघे शिवशक्तीनगर येथील गणपती पाहण्यासाठी आपल्या घराबाहेर पडले होते. रात्र झाली तरी अनमोल व कार्तिक दोघेही घरी परतले नाहीत. त्यामुळे कुटुंबीयांची चिंता वाढली.
त्यांनी लगेच उद्यमबाग पोलीस स्थानकात एफआयआर दाखल केले. प्रश्न लहान मुलांचा असल्याने पोलीस निरीक्षक डी. के. पाटील, पोलीस उपनिरीक्षक किरण होनकट्टी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दोन्ही मुलांच्या शोधासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी विशेष पथक स्थापन करण्यात आले होते. श्री विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तासाठी आलेल्या मायाप्पा फकिरप्पा सनदी व याच परिसरात असलेल्या चेतन शिवाप्पा कोंबन्नवर या मुलाच्या मदतीने अनमोल व कार्तिक यांचा शोध घेण्यात पोलीस पथकाला यश आले. दोन्ही मुलांचा शोध लागताच कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्यांना कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.









