केरळमधील स्वारस्यपूर्ण घटना, सर्वत्र चर्चेचा विषय
वृत्तसंस्था /’ कोची
‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ या 1995 मध्ये गाजलेल्या चित्रपटातील हिरो आणि हिरॉईन रेल्वेगाडीतून पळून जातात, असे दृष्य आहे. त्या चित्रपटातील रेल्वेगाडी त्या विशिष्ट स्टेशनवर तिच्या वेळापत्रकानुसार थांबली, म्हणून त्यांना पळून जाणे शक्य झाले आणि चित्रपट पुढे सरकला. पण केरळमध्ये सोमवारी एक रेल्वेच्याच संदर्भात एक घटना अशी घडली की, ती या चित्रपटात घडली असती, तर चित्रपटाची संपूर्ण स्टोरीच बदलावी लागली असती.
घडलेला प्रकार असा की, कोचीहून शोरानूर येथे जाण्यासाठी निघालेली एक रेल्वे गाडी वेनाड एक्स्प्रेस मधल्या चेरियानाड या स्थानकावर थांबणार होती. तथापि, हे स्थानक लहान असल्याने आणि गाडीच्या चालकाने लक्ष न दिल्याने या स्थानकावर न थांबताच ही गाडी पुढे गेली. गाडी साधारणत: 1 किलोमीटर पुढे आल्यानंतर स्थानक चुकल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने ब्रेक्स लावले आणि गाडी थांबविली. त्यानंतर त्याने चक्क एक किलोमीटर अंतर ती गाडी रिव्हर्स आणली आणि स्थानकात थांबविली. नंतर गाडी पुन्हा पुढच्या प्रवासाला लागली.

चर्चेचा विषय
हा प्रकार सकाळी 7.45 च्या आसपास घडला. चेरियानाड हे ड दर्जाचे स्थानक आहे. ते केवळ एक ‘हॉल्ट स्टेशन’ आहे. तेथे मोठ्या संख्येने प्रवाशांची ये जा नसते. तथापि, नियमाप्रमाणे तेथे ही गाडी थांबविणे आवश्यक होते. पण चालकाच्या दुर्लक्षामुळे तसे झाले नाही. चालकाने गाडी 1 किलोमीटर मागे आणून आपली चूक सुधारली. तथापि, इतके मोठे अंतर संपूर्ण रेल्वेगाडी मागे आणण्यात धोका मोठा असतो. डबे रुळावरुन घसरु शकतात. रेल्वे एखाद्या कारप्रमाणे सहजगत्या रिव्हर्स आणता येत नाही. तसेच ती वळवूनही मागे आणता येत नाही. पण या स्थानकावर उतरणारा कोणी प्रवासी गाडीत असेल, किंवा या स्थानकावर गाडीत चढण्यासाठी कोणी प्रवासी आला असेल, तर त्यांची गैरसोय होऊ नये. म्हणून त्याने गाडी रिव्हर्स आणण्याचा धोका पत्करला.
पांघरुण घालण्याचा प्रयत्न
ही घटना फारशी महत्वाची नाही. तिचा मोठा बाऊ करण्याचे कारण नाही, असे स्पष्ट करत रेल्वे अधिकाऱ्यांनी या घटनेवर पांघरुण घालण्याचा प्रयत्न केला. पण यानिमित्ताने अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. ड दर्जाच्या स्थानकांवर कित्येकदा सिग्नल्स नसतात. तेथे रेल्वेचे चालक त्यांच्या माहितीच्या आधारावर थांबा घेतात. काहीवेळा अननुभवी चालकांकडून अशी स्थानके चुकतात. पण कोणी गाडी रिव्हर्स आणल्याचे उदाहरण घडलेले नाही, असे या संदर्भात आता बोलले जात आहे. एकंदर, हा प्रसंग फारसा महत्वाचा नसला आणि तो सुखरुपपणे निभावला गेला असला, तरी तो चर्चेचा विषय मात्र निश्चितच बनला आहे.









